YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 18:3-13

२ इतिहास 18:3-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अहाब त्यास म्हणाला, “रामोथ-गिलादावरील स्वारीत तूही माझ्याबरोबर सहभागी होशील का?” अहाब इस्राएलचा राजा होता आणि यहोशाफाट यहूदाचा. यहोशाफाट त्यास म्हणाला, “तू आणि मी काही वेगळे नाही. माझी माणसे ती तुझीच माणसे. आम्ही अवश्य लढाईत भाग घेऊ.” यहोशाफाट इस्राएलाच्या राजाला पुढे असेही म्हणाला, “पण त्यापुर्वी परमेश्वराचा आदेशही घेऊ या.” तेव्हा इस्राएलाचा राजा अहाबाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना बोलावून विचारले, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही? तेव्हा ते संदेष्टे राजा अहाबाला म्हणाले, “जरुर जा. कारण देव राजाला जय देईल.” पण यहोशाफाट म्हणाला, “यांच्याखेरीज परमेश्वराचा संदेष्टा इथे कोणी आहे का? परमेश्वरास त्याच्या संदेष्ट्यामार्फतच आपण विचारायला हवे.” तेव्हा इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “इथे तसा एकजण आहे. त्याच्या मार्फत आपण परमेश्वरास विचारु शकतो. पण मला त्याच्याकडून कधीच अनुकूल संदेश मिळत नाही. नेहमी प्रतिकूल संदेशच तो मला देतो, त्यामुळे मला त्याचा द्वेष वाटतो. त्याचे नाव मीखाया. तो इम्लाचा पुत्र.” पण यहोशाफाट म्हणाला, “अहाब, तू असे म्हणू नकोस.” तेव्हा इस्राएलाच्या राजाने आपल्या एका कारभाऱ्याला बोलावून “इम्लाचा पुत्र मीखाया याला लगेच घेऊन यायला सांगितले.” इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे परिधान करून शोमरोन नगराच्या वेशीजवळच्या खळ्यात आपापल्या सिंहासनांवर विराजमान झाले होते. त्यांच्यासमोर ते चारशे संदेष्टे भविष्यकथन करत होते. कनानचा पुत्र सिदकीया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘अरामी लोकांचा या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नाश कराल.’” इतर सर्व संदेष्ट्यांनीही तेच सांगितले. ते म्हणाले, “रामोथ-गिलाद वर चालून जा. तुम्ही विजयी व्हाल. परमेश्वर तुझ्या हातून म्हणजे राजाच्या हातून अराम्यांचा पराभव करील.” मीखायला आणायला गेलेला निरोप्या त्यास म्हणाला, “मीखाया, ऐक सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे. राजाची सरशी होईल असे ते म्हणतात. तेव्हा तूही तसेच म्हणावेस. तू ही चांगले उद्गार काढ.” पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.”

सामायिक करा
२ इतिहास 18 वाचा

२ इतिहास 18:3-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

इस्राएलचा राजा अहाबाने यहूदीयाचा राजा यहोशाफाटला विचारले, “तुम्ही माझ्याबरोबर रामोथ गिलआदविरुद्ध जाल का?” यहोशाफाटने उत्तर दिले, “तुम्ही जसे आहात तसाच मी आहे आणि माझे लोक तुमचे लोक आहेत; आम्ही तुमच्या युद्धात सहभागी होऊ.” परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.” तेव्हा इस्राएलच्या राजाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “आम्ही रामोथ-गिलआदच्या विरुद्ध युद्धास जावे की नाही?” त्यांनी उत्तर दिले, “जा, कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.” परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?” इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.” यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.” तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका अधिकार्‍याला बोलाविले व म्हटले, “लवकर जाऊन इम्लाहचा पुत्र मिखायाह याला घेऊन ये.” इस्राएलचा राजा आणि यहूदीयाचा राजा यहोशाफाट आपली राजवस्त्रे परिधान करून शोमरोनाच्या प्रवेशद्वाराजवळील खळ्याजवळ त्यांच्या सिंहासनांवर बसले होते, आणि संदेष्टे त्यांच्यासमोर संदेश देत होते. तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह याने लोखंडाची शिंगे तयार केली होती, आणि त्याने जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘या शिंगांनी तू अरामी लोकांवर असा वार करशील की त्यांचा नाश होईल.’ ” इतर सर्व संदेष्टे सुद्धा तीच भविष्यवाणी करीत होते, ते म्हणाले, “रामोथ-गिलआदवर हल्ला करून विजयी हो कारण याहवेह ते राजाच्या हाती देणार आहे.” जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे, आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.” पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, माझे परमेश्वर मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.”

सामायिक करा
२ इतिहास 18 वाचा

२ इतिहास 18:3-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला इस्राएलाचा राजा अहाब म्हणाला, “रामोथ-गिलाद येथे लढायला आपण माझ्याबरोबर याल काय?” त्याला यहोशाफाटाने उत्तर दिले, “मी आणि आपण एकच; माझे लोक ते आपले लोक; आम्ही आपल्याबरोबर लढाईस येऊ.” यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “आज परमेश्वराचा आदेश घ्या.” इस्राएलाच्या राजाने सुमारे चारशे संदेष्टे जमवून त्यांना विचारले, “आम्ही रामोथ-गिलादावर चढाई करून जावे की न जावे?” त्यांनी उत्तर दिले, “चढाई करून जावे; देव ते राजाच्या हाती देईल.” तेव्हा यहोशाफाटाने विचारले, “ह्यांच्याखेरीज परमेश्वराचा दुसरा कोणी संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्‍न विचारू.” इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो; कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो; तो इम्लाचा पुत्र मीखाया होय.” यहोशाफाट म्हणाला, “राजाने असे बोलू नये.” तेव्हा इस्राएलाच्या राजाने एका कारभार्‍यास बोलावून सांगितले, “लवकर जाऊन इम्लाचा पुत्र मीखाया ह्याला घेऊन ये.” इस्राएलाचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शोमरोनाच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते, आणि सर्व संदेष्टे त्यांच्यापुढे भाषण करीत होते. तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया ह्याने लोखंडाची शिंगे करून आणली होती; तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘ह्या शिंगांनी तू अरामी लोकांना हुंदडून त्यांचा नाश करशील.”’ सर्व संदेष्टे त्याच्याप्रमाणे भाषण करू लागून म्हणाले, “रामोथ-गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो; कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.” जो जासूद मीखायाला बोलावण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे एका विचाराचे होऊन राजासंबंधाने शुभवचन बोलत आहेत, म्हणून त्यांच्याप्रमाणेच तूही शुभसंदेश कथन करावास.” मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ माझा देव जे काही सांगेल तेच मी बोलेन.”

सामायिक करा
२ इतिहास 18 वाचा