२ इतिहास 1:1-13
२ इतिहास 1:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर देव सोबत असल्याने दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राज्यकर्ता झाला व परमेश्वराने त्यास फार सामर्थ्यवान केले. शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील वाडवडीलांच्या घराण्यांचे प्रमुख या सर्वांशी बोलला. मग तो आणि त्याच्या बरोबरची ही सर्व मंडळी गिबोन येथील उच्चस्थानी गेली. कारण परमेश्वराचा दर्शनमंडप तेथे होता, कारण परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक रानात असतांना मोशेने तो बनवला होता. दाविदाने देवाचा कोश किर्याथ-यारीमाहून वर यरूशलेम येथे आणला होता. यरूशलेमेमध्ये तो ठेवण्यासाठी दाविदाने जागा तयार केली होती. कराराच्या कोशासाठी त्याने यरूशलेमेमध्ये एक तंबू उभारला होता. हुराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याने पितळी वेदी केली होती. ती वेदी गिबोन येथील परमेश्वराच्या निवसमंडपासमोर होती, म्हणून शलमोन आपल्याबरोबरच्या इस्राएल लोकांसह गिबोन येथे परमेश्वराचा सल्ला घेण्यासाठी गेला. दर्शनमंडपाजवळ परमेश्वरासमोर पितळी वेदी होती तेथे शलमोनाने एक हजार होमार्पणे केली. त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले तो म्हणाला, “शलमोना, तुला काय हवय ते माग!” शलमोन परमेश्वरास म्हणाला, “माझे पिता दावीद यांच्यावर तुझी फार कृपादृष्टी होती, त्यांच्या जागी तू मला राजा म्हणून निवडलेस. आता, हे परमेश्वर देवा, तू माझे पिता दावीद यांना दिलेले वचन पूर्ण कर, कारण ज्या राष्ट्रांचा तू मला राजा केले आहेस, त्याच्या प्रजेची संख्या पृथ्वीवरील मातीच्या रज:कणांसारखी विपुल आहे. या लोकांस उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे, तुझ्या एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कोणाला जमणार?” तेव्हा परमेश्वर देव शलमोनाला म्हणाला, “हे तुझ्या मनात होते, आणि तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा सन्मान यांची मागणी केली नाहीस तसेच तुझा द्वेष करणाऱ्या शत्रूंचाही नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस, तसेच स्वत:साठी दीर्घायुष्य मागितले नाहीस तर ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेवर राज्य करता यावे म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस; आता तुला ज्ञान व बुद्धी देण्यात आली आहेत; तुझ्या पुर्वीच्या कोणाही राजाला मिळाले नाही व तुझ्यानंतर कोणत्याही राजाला मिळाले नाही एवढे ऐश्वर्य, संपत्ती व बहुमान मी तुला देईन.” मग शलमोन गिबोनाच्या उच्चस्थानाहून, दर्शनमंडपासमोरून यरूशलेमेस आला, व इस्राएलावर राज्य करू लागला.
२ इतिहास 1:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दावीद राजाचा पुत्र शलोमोनाने स्वतःस इस्राएलच्या राज्यावर भक्कमपणे स्थापित केले, कारण याहवेह त्याच्या परमेश्वराने त्याला अत्यंत महान बनविले होते. मग शलोमोन संपूर्ण इस्राएलास म्हणाला—फौजेचे सहस्त्राधिपती व शताधिपती, न्यायाधीश, इस्राएलातील सर्व पुढारी, कुटुंबप्रमुख— शलोमोन व संपूर्ण सभा गिबोनच्या उच्चस्थानी गेले, कारण याहवेहचा सेवक मोशेने अरण्यवासात परमेश्वराचा सभामंडप उभारला होता. दावीदाने किर्याथ-यआरीमहून परमेश्वराचा कोश आणला, कारण त्याने त्याकरिता यरुशलेम येथे एक मंडप उभारला होता. परंतु हूरचा पुत्र, उरीचा पुत्र बसालेलाने गिबोनात कास्याच्या धातूची वेदी याहवेहच्या कोशासमोर बनविली होती; आता शलोमोन व सर्व लोक त्यांची इच्छा जाणून घेण्यास आले. शलोमोन याहवेहच्या समक्षतेत सभामंडपात गेला व त्याने कास्याच्या वेदीवर एक हजार होमबली अर्पिले. त्या रात्री परमेश्वर शलोमोनला दर्शन देऊन म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.” शलोमोनाने परमेश्वराला उत्तर दिले, “आपला सेवक माझे पिता दावीद याला आपण अपार दया दाखविली आणि त्यांच्या जागी तुम्ही मला राजा म्हणून नेमले. आता याहवेह परमेश्वरा, माझे पिता दावीदाला दिलेली वचने पूर्ण होऊ द्यावी, जमिनीवरील धूलिकणांप्रमाणे असंख्य लोक असलेल्या राष्ट्राचा तुम्ही मला राजा बनविले. या लोकांना मार्गदर्शन करण्यास मला सुज्ञता व ज्ञान द्या, कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकणार?” तेव्हा परमेश्वर शलोमोनाला म्हणाले, “जर हीच तुझ्या मनातील इच्छा आहे व तू धनदौलत, संपत्ती किंवा मान सन्मान मागितला नाहीस. मी तुझ्या शत्रूंना मृत्यू द्यावा अथवा स्वतःसाठी मोठे आयुष्यमान ही मागणी देखील केली नाहीस, तर ज्या माझ्या लोकांवर मी तुला राजा बनविले त्यांच्यावर नीट शासन करता यावे म्हणून तू सुज्ञता व ज्ञान मागितलेस, तुला सुज्ञता व ज्ञान देण्यात येईल. याशिवाय मी तुला इतकी धन, संपत्ती आणि सन्मान देईन की, आतापर्यंत कोणत्याही राजाला कधीही प्राप्त झाले नव्हते व कोणालाही होणार नाही.” नंतर शलोमोन गिबोनाच्या उच्च स्थानावरील सभामंडपावरून निघून यरुशलेमास गेला आणि इस्राएलावर राज्य करू लागला.
२ इतिहास 1:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाचा पुत्र शलमोन हा आपल्या गादीवर कायम झाला; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; त्याने त्याला अति थोर पदास चढवले. शलमोनाने सर्व इस्राएलाला म्हणजे सहस्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्राएलाच्या पितृकुळांचे सर्व नायक ह्यांना सांगितल्यावरून शलमोनासह सर्व मंडळी गिबोन येथील उच्च स्थानी गेली; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने रानात बनवलेला देवाचा दर्शनमंडप तेथेच होता. दाविदाने देवाच्या कोशासाठी जे स्थळ तयार केले होते तेथे किर्याथ-यारीमाहून तो आणला होता; त्याने यरुशलेमेत त्यासाठी डेरा उभारला होता. बसालेल बिन ऊरी बिन हूर ह्याने केलेली पितळेची वेदी परमेश्वराच्या निवासमंडपापुढे असे; शलमोन मंडळीसह तिकडे गेला. दर्शनमंडपाजवळ परमेश्वरासमोर जी पितळेची वेदी होती तिच्याजवळ शलमोनाने जाऊन तिच्यावर एक हजार होमबली अर्पण केले. त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन देऊन म्हटले की, “तुला काय वर हवा तो माग.” शलमोन देवाला म्हणाला, “माझा पिता दावीद ह्याच्यावर तुझी फार कृपा असे व तू मला त्याच्या जागी राजा केले आहेस. आता हे परमेश्वरा देवा, तू माझा बाप दावीद ह्याला दिलेले वचन पूर्ण कर; मातीच्या रजःकणांप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केले आहेस. ह्या प्रजेसमोर वागण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे; तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता येईल?” देव शलमोनाला म्हणाला, “ज्या अर्थी असा तुझा मानस आहे म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य हे मागितले नाहीस, आपल्या वैर्यांचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुषी होण्याचे मागितले नाहीस, तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमले आहे त्या माझ्या लोकांचे शासन करण्यासाठी चातुर्य व ज्ञान एवढेच तू स्वत:साठी मागितलेस, त्या अर्थी चातुर्य व ज्ञान हे तर तुला देतोच; ह्यांखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजाला प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणालाही कधी प्राप्त व्हायची नाही एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईन.” मग शलमोन गिबोन येथल्या उच्च स्थानाच्या दर्शनमंडपासमोरून यरुशलेमेस आला व तेथे इस्राएलावर राज्य करू लागला.