1 थेस्सल 1:2-10
1 थेस्सल 1:2-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेली सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो. बंधूंनो, तुम्ही देवाचे प्रिय आहात, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच; कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हास कळविण्यात आली तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला; अशाने मासेदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना तुम्ही उदाहरण असे झाला आहात. मासेदोनिया व अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे; इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाची बातमीही सर्वत्र पसरली आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगायची गरज नाही. कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळला आणि जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास, आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास, तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मरण पावलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
1 थेस्सल 1:2-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हाला निरंतर स्मरण करीत, तुमच्या सर्वांबद्दल सतत परमेश्वराचे आभार मानतो. आपले पिता परमेश्वरापुढे तुमचे विश्वासाचे कार्य व प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेचा धीर यांची आम्ही निरंतर आठवण करतो. परमेश्वराचे प्रीतीस पात्र माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहीत आहे की परमेश्वराने तुम्हाला निवडले आहे. कारण आमची शुभवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दाने नव्हे, परंतु शक्तीने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण खात्रीने आली. तुमच्याकरिता तुम्हामध्ये तुमच्याबरोबर राहत असताना आम्ही कसे राहिलो हे तुम्हाला माहीतच आहे. पवित्र आत्म्याने जो आनंद तुम्हाला दिला आहे, त्याद्वारे तुम्ही अतिशय क्लेशांमध्ये असतानाही संदेशाचा स्वीकार केला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाले; आणि म्हणूनच मासेदोनिया व अखया येथील सर्व विश्वासणार्यांसाठी तुम्ही आदर्श झाले. प्रभूचा संदेश तुम्हाद्वारे केवळ मासेदोनिया व अखया येथेच घोषित करण्यात आला असे नाही, तर परमेश्वरावरील तुमचा विश्वास सर्वत्र जाहीर झाला आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल काही सांगण्याची आम्हाला गरजच राहिली नाही. कारण ते स्वतः अहवाल देतील की आमचे स्वागत तुम्ही कशाप्रकारे केले आणि जे जिवंत व खरे परमेश्वर आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही मूर्तीपासून कसे दूर झाला आहात. आणि परमेश्वराचा पुत्र येशू ज्यांना त्यांनी मृतांतून पुनरुत्थित केले, जे येणार्या क्रोधापासून, आपल्याला सोडवितात त्यांची स्वर्गातून येण्याची तुम्ही वाट पाहात आहात.
1 थेस्सल 1:2-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हांला ठाऊक आहेच; कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हांला कळवण्यात आली; तसेच तुमच्याकरता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हांला ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात; अशाने मासेदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झालात. मासेदोनिया व अखया ह्यांत तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायचे अगत्य नाही. कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास, आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात, हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात; त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे.
1 थेस्सल 1:2-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करीत तुम्हां सर्वांविषयी देवाचे सर्वदा आभार मानतो; कारण तुम्ही तुमची श्रद्धा कृतीत कशी उतरवीत आहात, तुमच्या प्रीतीमुळे तुम्ही कसे श्रम करीत आहात आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील तुमची आशा कशी स्थिर आहे, ह्यांचे आम्ही देवपित्यासमोर निरंतर स्मरण करतो. आमच्या प्रिय बंधूंनो, देव तुमच्यावर प्रीती करतो व त्याने तुम्हांला त्याची प्रजा म्हणून निवडले आहे, हे आम्हांला ठाऊक आहे. आमचे शुभवर्तमान केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खातरीने तुम्हांला कळविण्यात आले. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो, हे तुम्हांला ठाऊक आहे. तुमचा छळ होत असतानाही तुम्ही देवाचा शद्ब पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन आनंदाने स्वीकारला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. अशाने मासेदोनिया व अखया येथील सर्व श्रद्धावंत ह्यांना तुम्ही आदर्श झालात. मासेदोनिया व अखया ह्या ठिकाणी तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वृत्तदेखील सर्वत्र पसरले आहे. ह्यामुळे त्याविषयी आम्हांला काही सांगावयाची गरज नाही. तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, याविषयी ते सर्व लोक बोलत आहेत. तसेच जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्याकरिता व त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्याकरिता तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात हे आपण होऊन ते तुमच्याविषयी सांगत आहेत. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठविले व तो आपल्याला देवाच्या भावी क्रोधापासून वाचविणारा आहे.