YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 8:10-22

१ शमुवेल 8:10-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग ज्या लोकांनी त्याच्याकडे राजा मागितला होता त्यांना शमुवेलाने परमेश्वराचे सर्व म्हणणे कळवले. तो म्हणाला, “तुमच्यावर जो राजा राज्य करील तो अशी सत्ता चालवील की तो तुमच्या पुत्रांना धरून आपले रथ व घोडे ह्यांची चाकरी करायला ठेवील, आणि ते त्याच्या रथांपुढे धावतील. त्यांतून कित्येक हजाराहजारांवर व पन्नासापन्नासांवर नायक म्हणून तो नेमील; कित्येकांना आपली शेते नांगरायला, कापायला व आपल्या लढाईची व रथाची हत्यारे करण्याच्या कामाला लावील. तो तुमच्या कन्यांना धरून हलवाइणी, स्वयंपाकिणी व भटारणी करील. तो तुमची उत्तम उत्तम शेते, द्राक्षांचे मळे व जैतुनांचे मळे घेऊन आपल्या नोकरांना देईल. तो तुमचे धान्य व द्राक्षांचे मळे ह्यांचा एक दशमांश घेऊन आपले खोजे व चाकर ह्यांना देईल. तो तुमचे दास व दासी, तुमची खिल्लारे1 व गाढवे धरून आपल्या कामावर लावील. तो तुमच्या शेरडामेंढरांचा एक दशमांश घेईल; तुम्ही त्याचे दास व्हाल. त्या दिवशी तुम्ही निवडून घेतलेल्या राजाविषयी गार्‍हाणी कराल, पण परमेश्वर त्या दिवशी तुम्हांला उत्तर देणार नाही.” तरीपण लोक शमुवेलाचे म्हणणे ऐकेनात; ते म्हणाले, “नाही, नाही! आमच्यावर राजा पाहिजेच; म्हणजे इतर सर्व राष्ट्रांसमान आम्ही होऊ; आमचा राजा आमचा न्यायनिवाडा करील व आमच्यापुढे चालून तो आमच्या लढाया लढेल.” शमुवेलाने लोकांचे हे सर्व म्हणणे ऐकून परमेश्वराच्या कानावर घातले. परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “त्यांचे म्हणणे ऐक आणि त्यांच्यावर एक राजा नेम.” मग शमुवेल इस्राएल लोकांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या नगरांना जा.”

सामायिक करा
१ शमुवेल 8 वाचा

१ शमुवेल 8:10-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग शमुवेलाने, ज्या लोकांनी राजा मागितला होता त्यांना, परमेश्वराची सर्व वचने सांगितली. तो त्यांना म्हणाला, “जो राजा तुम्हावर राज्य करील त्याची रीत अशी होईल; तो तुमचे पुत्र घेऊन आपल्या रथांसाठी व आपले घोडेस्वार होण्यासाठी ठेवील आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील. तो त्यांना आपले हजारांचे सरदार नेमून ठेवील. जमीन नांगरायला, आपली पिके कापायला, आणि आपली लढाईची शस्त्रे व आपली रथांची शस्त्रे करायला ठेवील. तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या, स्वयंपाकिणी, आणि भटारखान्यात काम करणाऱ्या होण्यास घेईल. तुमची जी उत्तम ती शेते, तुमचे द्राक्षमळे, आणि तुमचे जैतूनाचे मळे घेऊन, ते तो त्याच्या चाकरांना देईल. तो तुमची पीके व तुमचे द्राक्षमळे यांचा दशमांश घेऊन, तो आपल्या कारभाऱ्यांना देईल. तुमचे दास आणि तुमच्या दासी व तुमचे उत्तम तरुण व तुमची गाढवे घेऊन, ते तो आपल्या कामाला लावील. तुमच्या मेंढरांचा दशमांश तो घेईल व तुम्ही त्याचे दास व्हाल. त्यानंतर तुम्ही आपणासाठी निवडलेल्या राजामुळे ओरडाल; परंतु परमेश्वर त्या दिवसात तुम्हास उत्तर देणार नाही.” पण लोक शमुवेलाचा शब्द ऐकायला नाकारून म्हणाले, “असे नाही! आम्हांवर राजा पाहिजेच म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आणि आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हापुढे चालून आमच्या लढाया लढेल.” शमुवेलाने जेव्हा लोकांनी दिलेल्या उत्तराचे सर्व शब्द ऐकून परमेश्वरास ऐकवले; मग तेव्हा परमेश्वर शमुवेलाशी बोलला, “तू त्यांचा शब्द ऐकून त्याच्यांवर राज्य करायला राजा नेमून ठेव.” तेव्हा शमुवेल इस्राएलाच्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकजण आपापल्या नगरास परत जा.”

सामायिक करा
१ शमुवेल 8 वाचा