१ शमुवेल 5:1-12
१ शमुवेल 5:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला होता तो त्यांनी एबन-एजराहून अश्दोदास नेला. आणि पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला तो त्यांनी दागोनाच्या देवळात नेऊन दागोनाच्याजवळ ठेवला. जेव्हा अश्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले, तेव्हा पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला होता. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेऊन त्याच्या ठिकाणी परत ठेवला. पण ते दुसऱ्या दिवशी पहाटेस उठल्यावर, पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला आहे आणि दागोनाचे डोके व त्याच्या हाताचे दोन्ही पंजे तुटलेले उंबऱ्यावर पडले आहेत. दागोनाचे धड तेवढे त्यास राहिले होते. म्हणून, आजपर्यंत, दागोनाचे याजक व दागोनाच्या घरात येणारे ते अश्दोदकर दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत. मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा भारी हात पडला व त्याने त्यांचा नाश केला, म्हणजे अश्दोदाला आणि त्यांच्या प्रदेशातील लोकांस गाठींच्या पीडेने पीडले. तेव्हा अश्दोदकरांनी जे काही घडत आहे ते ओळखले, ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश आम्हामध्ये राहू नये कारण त्याचा हात आम्हांवर व आमच्या दागोन देवाविरूद्ध भारी झाला आहे.” मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना आपणाकडे एकवट करून म्हटले, “इस्राएलाच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” ते बोलले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथाला न्यावा.” मग त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश तेथे नेला. परंतु असे झाले की त्यांनी तो तेथे नेल्यावर, परमेश्वराचा हात त्याच्यावर पडून त्या नगरात मोठा गोंधळ उडाला. त्याने नगरातली लहान आणि मोठी माणसे यांना पीडले. आणि त्यांच्या अंगावर गाठी उठल्या. मग त्यांनी देवाचा कोश एक्रोनाला पाठवला; परंतु, असे झाले की, “देवाचा कोश एक्रोन येथे येताच एक्रोनकर ओरडून म्हणाले आम्हांला व आमच्या लोकांस मारायला इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.” मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र केले; ते त्यांना म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश त्याच्याजागी परत पाठवून द्या, यासाठी की, त्याने आम्हास व आमच्या लोकांस मारू नये.” कारण तेथे सर्व नगरात मरणाचे भयंकर भय पसरले होते; देवाचा जबरदस्त हात त्यांच्यावर पडला होता. जी माणसे मरण पावली नाहीत त्यास त्यांना गाठीने पीडले, आणि नगराचा आक्रोश वर आकाशापर्यंत गेला.
१ शमुवेल 5:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पलिष्ट्यांनी देवाचा कोश घेतला तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला. पलिष्ट्यांनी देवाचा कोश दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोनाजवळ ठेवला. अश्दोदकर दुसर्या दिवशी पहाटेस उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवले. दुसर्या दिवशी पहाटेस ते उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे, त्याचे शीर व दोन्ही हातांचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ह्या कारणास्तव आजपर्यंत दागोनाचे पुजारी व इतर जे कोणी दागोनाच्या मंदिरात जातात ते अश्दोद येथील दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत. मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा जबर हात पडला; त्याने त्यांचा नाश केला; त्याने अश्दोदकर व त्यांच्या आसपासच्या गावांतील लोक ह्यांना ग्रंथीच्या व्याधीने पिडले. हे पाहून अश्दोदकरांनी म्हटले, “इस्राएलाच्या देवाचा कोश आमच्यामध्ये राहता कामा नये, कारण त्याचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन ह्याच्यावर जबर पडला आहे.” मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमा केले आणि विचारले, “आम्ही इस्राएलाच्या देवाच्या कोशाचे काय करावे?” ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचता करावा.” तेव्हा त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचवला. तो कोश तेथे मिरवत नेल्यावर असे झाले की परमेश्वराचा हात त्या नगरावर फार जबर पडून मोठा कहर गुदरला. त्याने त्या नगरातील आबालवृद्धांना पिडले; त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या. मग त्यांनी देवाचा कोश एक्रोन येथे पाठवला; तो एक्रोन येथे जाऊन पोचताच एक्रोनकरांनी ओरड केली की, “आमचा व आमच्या लोकांचा संहार करण्यासाठी इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.” मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमवले आणि म्हटले, “इस्राएलाच्या देवाचा कोश येथून पाठवून द्या, तो स्वस्थानी परत जाऊ द्या, म्हणजे तो आमचा व आमच्या लोकांचा संहार करायचा नाही.” कारण सर्व नगरात कहर गुदरला होता, आणि देवाचा हात त्यांच्यावर जबर पडला होता. जे लोक मेले नाहीत त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या आणि त्या नगराचा आक्रोश गगनापर्यंत जाऊन पोहचला.