१ शमुवेल 30:21-26
१ शमुवेल 30:21-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग जी दोनशे माणसे थकल्यामुळे दावीदाच्या मागे गेली नाहीत, ज्यांना त्याने बसोर नदीपाशी ठेवले होते, त्यांच्याकडे दावीद आला तेव्हा ती दावीदाला भेटायला व त्यांच्याबरोबरच्या लोकांस भेटायला सामोरी आली आणि दावीदाने त्या मनुष्यांजवळ येऊन त्यांना त्यांचे कुशल विचारले. तेव्हा जी माणसे दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती. ती सर्व असे म्हणू लागली की, “ही माणसे आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातले काही आम्ही त्यांना देणार नाही; फक्त प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊ. मग त्यांनी ती घेऊन निघून जावे.” तेव्हा दावीद म्हणाला, “माझ्या भावांनो जे परमेश्वराने आम्हांला दिले आहे त्याचे असे करू नका. कारण त्याने आम्हास संभाळले व जी टोळी आम्हावर आली ती आमच्या हाती दिली. या गोष्टीविषयी तुमचे कोण ऐकेल? जो लढाईत गेला त्याचा जसा वाटा तसा जो सामानाजवळ राहतो त्याचा वाटा होईल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.” त्या दिवसापासून पुढे तोच नियम झाला; त्याने तसा नियम व रीत इस्राएलात आजपर्यंत करून ठेवली. दावीद सिकलागास आला तेव्हा त्याने यहूदाच्या वडिलांकडे आपल्या मित्रांकडे लुटीतले काही पाठवून सांगितले की, “पाहा परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हास ही भेट आहे.”
१ शमुवेल 30:21-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग जे दोनशे पुरुष फार थकल्यामुळे दाविदाबरोबर गेले नव्हते व ज्यांना बसोर नाल्याजवळ तो ठेवून गेला होता, त्यांच्याजवळ दावीद गेला. तेव्हा ते त्याला व त्याच्याबरोबरच्या लोकांना भेटायला सामोरे आले; आणि दाविदाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे क्षेमकुशल विचारले. तेव्हा दाविदाबरोबर गेलेल्या लोकांपैकी जे वाईट व अधम लोक होते ते म्हणू लागले, “काही लोक आमच्याबरोबर आले नाहीत म्हणून आम्ही जी लूट आणली आहे तिच्यातली त्यांना आम्ही काहीएक देणार नाही; प्रत्येकाची बायकापोरे मात्र ज्याची त्याला देऊ, त्यांनी त्यांना घेऊन निघून जावे.” पण दावीद म्हणाला, “बांधवहो, परमेश्वराने जे आपल्याला दिले आहे त्याचे असे करू नका. त्याने आपले रक्षण केले आहे व जी टोळी आपल्यावर चाल करून आली होती ती आपल्या हातात दिली आहे. ह्या बाबतीत तुमचे कोण ऐकणार? जे लढाईला गेले त्यांना जेवढा वाटा मिळेल तेवढाच जे सामानसुमानाजवळ राहिले त्यांनाही मिळेल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.” त्या दिवसापासून पुढे हीच वहिवाट पडली; त्याने असाच नियमविधी इस्राएलांस आजपर्यंत लावून दिला आहे. दावीद सिकलाग येथे आला तेव्हा त्याने आपले मित्र यहूदाचे वडील ह्यांच्याकडे लुटीचा काही भाग पाठवून त्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हांला ही भेट पाठवली आहे”