YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 30:1-31

१ शमुवेल 30:1-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसर्‍या दिवशी पोहचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यांवर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे, आणि तेथील स्त्रियांना व लहानमोठ्या सगळ्यांना त्यांनी कैद करून नेले आहे; त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तरी त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले. दावीद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यांना दिसून आले. तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही. दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इज्रेलीण अहीनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्यांना पाडाव करून नेले होते. तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला; कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले; पण दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. दावीद अहीमलेखाचा पुत्र अब्याथार याजक ह्याला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आण. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले. दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला, “मी ह्या टोळीचा पाठलाग करू काय? मी त्यांना गाठीन काय?” त्याने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, तू खात्रीने त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून आणशील.” तेव्हा दावीद आपल्याबरोबरची सहाशे माणसे घेऊन बसोर नाल्यापर्यंत जाऊन पोहचला; तेथे काही लोक मागे पडले व तेथे राहिले. दावीद व चारशे लोक ह्यांनी पाठलाग चालवला; बाकीचे दोनशे लोक एवढे थकून गेले होते की त्यांना बसोर नाल्यापलीकडे जाता येईना. त्या लोकांना मैदानात एक मिसरी पुरुष आढळला; त्याला त्यांनी दाविदाकडे नेले; त्यांनी भाकर दिली ती त्याने खाल्ली आणि त्याला त्यांनी पाणी पाजले. आणखी त्याला अंजिराच्या ढेपेचा तुकडा व दोन खिसमिसांचे घड दिले; ते खाऊन तो ताजातवाना झाला, कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती की तो पाणी प्याला नव्हता. दाविदाने त्याला विचारले, “तू कोण, कोठला?” त्याने म्हटले, “मी एक मिसरी तरुण पुरुष असून एका अमालेकी मनुष्याचा दास आहे. आज तीन दिवस झाले, मी आजारी पडलो म्हणून माझा धनी मला सोडून गेला. आम्ही करेथ्यांच्या दक्षिण प्रांतावर, यहूदा प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण भागावर स्वारी केली आणि सिकलाग आग लावून जाळून टाकले.” दावीद त्याला म्हणाला, “त्या टोळीकडे मला नेशील काय?” तेव्हा तो म्हणाला, “आपण मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी आपण देवाच्या नावाने आणभाक कराल तर मी आपल्याला त्या टोळीकडे नेईन.” तो त्याला तेथे घेऊन गेला तेव्हा त्याला असे दिसले की लोक जमिनीवर चोहोकडे पांगून खाऊनपिऊन मजा करीत आहेत; कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या प्रांतातून व यहूद्यांच्या प्रांतातून पुष्कळ लूट आणली होती. तेव्हा त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसर्‍या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत दावीद त्यांचा संहार करीत राहिला; त्यांच्यापैकी चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळून गेले होते त्यांखेरीज एकही मनुष्य वाचला नाही. अमालेकी लोकांनी पाडाव करून नेलेल्या सर्वांना दाविदाने सोडवले आणि आपल्या दोन्ही स्त्रियाही सोडवल्या. लहानथोर, कन्यापुत्र, लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते त्यांतले त्यांना परत मिळाले नाही असे काहीच नव्हते; दाविदाने ते सर्व परत आणले. दाविदाने त्यांची शेरडेमेंढरे, गाढवे, बैल वगैरे सर्व लुटले; ही जनावरे लोक आपल्या जनावरांपुढे हाकून नेताना ते म्हणाले, “ही दाविदाची लूट आहे.” मग जे दोनशे पुरुष फार थकल्यामुळे दाविदाबरोबर गेले नव्हते व ज्यांना बसोर नाल्याजवळ तो ठेवून गेला होता, त्यांच्याजवळ दावीद गेला. तेव्हा ते त्याला व त्याच्याबरोबरच्या लोकांना भेटायला सामोरे आले; आणि दाविदाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे क्षेमकुशल विचारले. तेव्हा दाविदाबरोबर गेलेल्या लोकांपैकी जे वाईट व अधम लोक होते ते म्हणू लागले, “काही लोक आमच्याबरोबर आले नाहीत म्हणून आम्ही जी लूट आणली आहे तिच्यातली त्यांना आम्ही काहीएक देणार नाही; प्रत्येकाची बायकापोरे मात्र ज्याची त्याला देऊ, त्यांनी त्यांना घेऊन निघून जावे.” पण दावीद म्हणाला, “बांधवहो, परमेश्वराने जे आपल्याला दिले आहे त्याचे असे करू नका. त्याने आपले रक्षण केले आहे व जी टोळी आपल्यावर चाल करून आली होती ती आपल्या हातात दिली आहे. ह्या बाबतीत तुमचे कोण ऐकणार? जे लढाईला गेले त्यांना जेवढा वाटा मिळेल तेवढाच जे सामानसुमानाजवळ राहिले त्यांनाही मिळेल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.” त्या दिवसापासून पुढे हीच वहिवाट पडली; त्याने असाच नियमविधी इस्राएलांस आजपर्यंत लावून दिला आहे. दावीद सिकलाग येथे आला तेव्हा त्याने आपले मित्र यहूदाचे वडील ह्यांच्याकडे लुटीचा काही भाग पाठवून त्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हांला ही भेट पाठवली आहे”; बेथेल, दक्षिणेतील रामोथ, यत्तोर, अरोएर, सिफमोथ, एष्टमो, राखाल व यरहमेली येथले नगरवासी, केन्यांच्या नगरातले रहिवासी, हर्मा, कोराशान, अथाख, आणि हेब्रोन आदिकरून ज्या ज्या ठिकाणी दावीद आपल्या लोकांसह फिरत असे तेथील आपल्या मित्रांना त्याने लुटीतून भेटी पाठवल्या.

सामायिक करा
१ शमुवेल 30 वाचा

१ शमुवेल 30:1-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

असे झाले की, दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावर व सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलागचा पाडाव करून ते अग्नीने जाळले होते. त्यातल्या स्त्रिया व त्यामध्ये जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते; त्यांनी कोणालाही जिवे मारले नव्हते, पण त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले. तर दावीद व त्याची माणसे नगराजवळ आली तेव्हा पाहा ते अग्नीने जाळलेले आहे आणि त्यांच्या स्त्रिया आणि त्यांचे पुत्र व त्यांच्या मुली धरून नेलेल्या आहेत असे त्यांनी पाहिले. तेव्हा दावीद व त्याच्याजवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही. दावीदाच्या दोघी स्त्रिया अहीनवाम इज्रेलीण व पूर्वी नाबाल कर्मेली याची पत्नी होती ती अबीगईल या धरून नेलेल्या होत्या. तेव्हा दावीद मोठ्या संकटात पडला कारण त्यास धोंडमार करावा असे लोक बोलू लागले; कारण सर्व मनुष्यांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दु:खित झाले होते; परंतु दावीदाने आपला देव परमेश्वर याच्याकडून आपणाला सशक्त केले. मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दावीदाकडे आणले. दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “जर मी या सैन्याच्या पाठीस लागलो तर मी त्यांना गाठेन काय?” त्याने त्यास उत्तर दिले की, “पाठीस लाग कारण खचित तू त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून घेशील.” मग दावीद त्याच्याकडील सहाशे पुरुष घेऊन बसोर नदीजवळ पोहचला. जे मागे ठेवले होते ते तेथे राहिले. तेव्हा दावीद व चारशे माणसे शत्रूच्या पाठीस लागली. कारण दोनशे माणसे तेथे थांबली; ती इतकी थकली होती की त्यांच्याने बसोर नदीच्या पलीकडे जाववेना. रानांत एक मिसरी त्यांना आढळला. तेव्हा त्यांनी त्यास दावीदाकडे आणले. मग त्यांनी त्यास भाकर दिली आणि ती त्याने खाल्ली व त्यांनी त्यास पाणी पाजले. मग त्यांनी अंजिराच्या ढेपेचा तुकडा व द्राक्षाचे दोन घड त्यास दिले मग त्याने खाल्ल्यावर त्याच्या जिवात जीव आला कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती पाणीही तो प्याला नव्हता. तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “तू कोणाचा? कोठला आहेस?” त्याने म्हटले, “मी मिसरी तरुण एका अमालेकी मनुष्याचा चाकर आहे: तीन दिवसामागे मी दुखण्यात पडलो म्हणून माझ्या धन्याने मला सोडले. आम्ही करेथी यांच्या दक्षिण प्रदेशावर व यहूदाच्या प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण प्रदेशावर घाला घातला आणि सिकलाग आम्ही अग्नीने जाळले.” मग दावीद त्यास म्हणाला, “तू मला या टोळीकडे खाली नेशील काय?” त्याने म्हटले, “तुम्ही मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी देवाची शपथ माझ्याशी वाहा म्हणजे मी तुम्हास या टोळीकडे खाली नेईन.” त्याने त्यांना खाली नेले, तेव्हा पाहा ते लोक अवघ्या भूमीवर पसरून खात व पीत व नाचत होते कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या देशातून व यहूद्याच्या देशातून पुष्कळ लूट घेतली होती. दावीद पहाटेपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत त्यांना मारीत गेला; त्यांच्यातील चारशे तरुण माणसे उंटावर बसून पळाली. त्यांच्याशिवाय त्यांच्यातला कोणीएक सुटला नाही. जे सर्व अमालेक्यांनी नेले होते ते दावीदाने सोडवले व आपल्या दोघी स्त्रिया सोडवल्या. लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली व लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होते त्यातले काहीच त्यांनी गमावले नाही; दावीदाने सर्व माघारी आणले. अवघी मेंढरे व गुरे दावीदाने घेतली; ती त्यांनी इतर सामानापुढे हाकून म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.” मग जी दोनशे माणसे थकल्यामुळे दावीदाच्या मागे गेली नाहीत, ज्यांना त्याने बसोर नदीपाशी ठेवले होते, त्यांच्याकडे दावीद आला तेव्हा ती दावीदाला भेटायला व त्यांच्याबरोबरच्या लोकांस भेटायला सामोरी आली आणि दावीदाने त्या मनुष्यांजवळ येऊन त्यांना त्यांचे कुशल विचारले. तेव्हा जी माणसे दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती. ती सर्व असे म्हणू लागली की, “ही माणसे आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातले काही आम्ही त्यांना देणार नाही; फक्त प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊ. मग त्यांनी ती घेऊन निघून जावे.” तेव्हा दावीद म्हणाला, “माझ्या भावांनो जे परमेश्वराने आम्हांला दिले आहे त्याचे असे करू नका. कारण त्याने आम्हास संभाळले व जी टोळी आम्हावर आली ती आमच्या हाती दिली. या गोष्टीविषयी तुमचे कोण ऐकेल? जो लढाईत गेला त्याचा जसा वाटा तसा जो सामानाजवळ राहतो त्याचा वाटा होईल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.” त्या दिवसापासून पुढे तोच नियम झाला; त्याने तसा नियम व रीत इस्राएलात आजपर्यंत करून ठेवली. दावीद सिकलागास आला तेव्हा त्याने यहूदाच्या वडिलांकडे आपल्या मित्रांकडे लुटीतले काही पाठवून सांगितले की, “पाहा परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हास ही भेट आहे.” जे बेथेलात होते त्यांना जे दक्षिण प्रदेशातील रामोथात होते त्यांना, व जे यत्तीरात होते त्यांना; जे अरोएरात होते त्यांना, व जे सिफमोथात होते त्यांना, व जे एष्टमोत होते त्यांना, जे राखासांत होते त्यांना, व जे येरहमेली यांच्या नगरांत होते त्यांना, व जे केनी यांच्या नगरांत होते त्यांना, जे हर्मात होते त्यांना, व जे कोराशानात होते त्यांना, व जे अथाखात होते त्यांना, आणि जे हेब्रोनात होते त्यांना, जेथे दावीद व त्याची माणसे फिरत असत त्या सर्व ठिकाणाकडे त्याने लुटीतले काही पाठवले.

सामायिक करा
१ शमुवेल 30 वाचा