१ शमुवेल 29:1-11
१ शमुवेल 29:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग पलिष्ट्यांनी आपली सर्व सैन्ये अफेक येथे एकत्र जमवली आणि इस्राएली मनुष्यांनी इज्रेलात एका झऱ्याजवळ छावणी दिली. पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरासोबत व हजांरासोबत पुढे चालले आणि त्यांच्या पिछाडीस दावीद व त्याची माणसे आखीशाबरोबर चालली. तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार बोलले, “हे इब्री येथे काय करतात?” मग आखीश पलिष्ट्यांच्या सरदाराना म्हणाला, “इस्राएलाचा राजा शौल याचा चाकर दावीद तो हाच आहे की नाही? तो माझ्याजवळ काही दिवस किंवा काही वर्षे राहिला आहे. आणि तो माझ्याकडे आला त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्याकडे मला काही अपराध सापडला नाही.” मग पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; आणि पलिष्ट्यांचे सरदार त्यास म्हणाले, “जे ठिकाण तू या मनुष्यास नेमून दिले येथे त्याच्या ठिकाणी त्याने जावे म्हणून त्यास परत जाण्यास सांग; त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर कदाचित तो लढाईत आमचा विरोधी होईल; कारण हा आपल्या प्रभूशी कशावरून समेट करणार नाही बरे? या आपल्या मनुष्यांच्या शिरांनीच की नाही? शौलाने हजारांना मारले व दावीदाने दहा हजारांना मारले, असे ते नाचत व गात ज्याच्याविषयी एकमेकांना म्हणाले, तोच हा दावीद आहे की नाही?” मग आखीशाने दावीदाला बोलावून त्यास म्हटले, “परमेश्वर जिवंत आहे; तू सरळपणाने वागला आहेस व माझ्याबरोबर सैन्यात तुझे बाहेर जाणे व तुझे आत येणे माझ्या दृष्टीने बरे आहे. आणि तू माझ्याजवळ आला त्या दिवसापासून आजपर्यंत तुझ्याठायी काही वाईट मला सापडले नाही. तथापि तू सरदारांच्या मनास येत नाहीस. तर तू पलिष्ट्यांच्या सरदारांना असंतूष्ट करू नये. म्हणून आता शांतीने निघून परत जा.” तेव्हा दावीद आखीशाला म्हणाला, “मी आपला धनी राजा याच्या शत्रूशी लढायला येऊ नये असे मी काय केले आहे? मी तुमच्या पुढे आलो त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हास आपल्या दासाच्याठायी काय सापडले आहे?” तेव्हा आखीशाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, “तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा चांगला आहेस असे मी जाणतो. परंतु याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये असे पलिष्ट्यांचे सरदार म्हणाले आहेत. तर आता तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासहीत तू पहाटेस ऊठ आणि उजेड झाला म्हणजे परत माघारे जा.” मग पलिष्ट्यांच्या देशात परत जाण्यास दावीद व त्याची माणसे मोठ्या पहाटेस उठली; पलिष्टी वर इज्रेल येथे गेले.
१ शमुवेल 29:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इकडे पलिष्ट्यांनी आपली सर्व सेना अफेकात एकत्र केली; इस्राएल लोकांनी इज्रेलात एका झर्याजवळ छावणी दिली होती. पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरशंभर व हजारहजार योद्ध्यांच्या पुढे चालले आणि सैन्याच्या पिछाडीस आखीशाबरोबर दावीदही आपल्या मनुष्यांच्या पुढे चालला. पलिष्ट्यांचे सरदार म्हणाले, “ह्या इब्र्यांचे येथे काय काम?” तेव्हा आखीश पलिष्ट्यांच्या सरदारांना म्हणाला, “इस्राएलाचा राजा शौल ह्याचा सेवक दावीद हा नव्हे काय? आज तो कैक दिवस किंबहुना कैक वर्षे माझ्याजवळ आहे : तो त्यांना सोडून माझ्याकडे आला तेव्हापासून आजपर्यंत मला त्याच्यात काही वावगे आढळले नाही.” पण पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; ते त्याला म्हणाले, “जे स्थळ तू त्याला दिले आहेस तेथे त्याला परत पाठवून दे; त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर तो आमचा वैरी होईल; तो आपल्या स्वामीला दुसर्या कशाने प्रसन्न करणार बरे? ह्या लोकांची शिरे कापूनच की नाही? ‘शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले,’ असे ज्याच्याविषयी लोक नाचून व गाऊन आळीपाळीने म्हणाले तोच हा दावीद ना?” तेव्हा आखीशाने दाविदाला बोलावून म्हटले, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू तर सात्त्विकपणाने वर्तला आहेस आणि सैन्यात मला तुझी वर्तणूक चांगली दिसून आली आहे; कारण जेव्हापासून तू माझ्याकडे आलास तेव्हापासून तुझ्या ठायी मला काही वाईट आढळून आले नाही; पण तू सरदारांच्या मनास काही येत नाहीस. तर आता तू सुखरूप परत जा, पलिष्ट्यांच्या सरदारांची इतराजी करून घेऊ नकोस.” दावीद आखीशास म्हणाला, “मी काय केले आहे? मी आपल्याकडे आलो तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला आपल्या दासाच्या ठायी काय आढळले आहे की आपला स्वामीराजा ह्याच्या शत्रूंशी लढायला मी जाऊ नये?” आखीश दाविदाला म्हणाला, “मला ठाऊक आहे की तू माझ्या दृष्टीने देवदूतासारखा चांगला आहेस; तरी पलिष्ट्यांचे सरदार म्हणतात की तू त्यांच्याबरोबर लढाईला जाऊ नयेस. तर आता तुझ्या धन्याचे चाकर जे तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासह पहाटेस ऊठ आणि उजाडताच मार्गस्थ हो.” दावीद व त्याचे लोक पहाटेस उठून पलिष्ट्यांच्या देशात परत गेले; इकडे पलिष्टी इज्रेलावर चढाई करून गेले.