YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 25:23-31

१ शमुवेल 25:23-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अबीगईलेने दावीदाला पाहिले तेव्हा ती लवकर गाढवा वरून उतरली आणि दावीदापुढे उपडे पडून तिने भूमीकडे नमन केले. तिने त्याच्या पाया पडून म्हटले, “माझ्या प्रभू अन्याय माझ्याकडे माझ्याकडेच असावा आणि मी तुम्हास विनंती करते तुमच्या दासीला तुमच्या कानी काही बोलू द्या, आणि तुम्ही आपल्या दासीचे शब्द ऐका. मी तुम्हास विनंती करते, माझ्या प्रभूने त्या वाईट मनुष्यास नाबालाला मारू नये, कारण जसे त्याचे नाव तसाच आहे, त्याचे नाव नाबाल (म्हणजे मूर्ख) असे आहे. आणि त्याच्याठायी मूर्खपणच आहे. परंतु माझ्या प्रभूची तरुण माणसे जी तुम्ही पाठवली त्यांना मी तुमच्या दासीने पाहिले नाही. तर आता माझ्या प्रभू परमेश्वर जिवंत आहे आणि तुझा जीव जिवंत आहे. रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून परमेश्वराने तुम्हास आवरले आहे. तर आता जे तुमचे शत्रू व जे माझ्या प्रभूचे वाईट करायला पाहतात ते नाबालासारखे होवोत. आता ही जी भेट तुमच्या दासीने माझ्या प्रभूकडे आणली आहे ती माझ्या प्रभूच्यामागून चालणाऱ्या तरुण मनुष्यांना द्यावी. मी तुम्हास विनंती करते, तुम्ही आपल्या दासीच्या अपराधाची क्षमा करा; कारण माझे प्रभू परमेश्वराच्या लढाया लढत आहेत, म्हणून परमेश्वर माझ्या प्रभूचे घर खरोखर स्थिर करील; आणि तुम्ही जिवंत आहात तो पर्यंत तुमच्याठाई दुष्टाई सापडणार नाही. जरी मनुष्ये उठून तुमच्या पाठीस लागले व तुमचा जीव घ्यायला पाहत असले, तरी माझ्या प्रभूचा जीव परमेश्वर तुमचा देव याच्याजवळ जीवांच्या समुहात बांधलेला राहील, आणि जसे गोफणीच्या खळग्यातून फेकतात, तसे तुमच्या शत्रूंचे जीव तो गोफणीतून फेकून देईल. असे होईल की, परमेश्वराने तुमच्यविषयी जे चांगले सांगितले आहे, ते सर्व तो माझ्या प्रभूचे करून तुम्हास इस्राएलाचा अधिपती नेमील. तेव्हा माझ्या प्रभूने विनाकारण रक्त पाडले व सूड घेतला ह्याबद्दल तुम्हास खेद होणार नाही किंवा मनाचा संताप माझ्या प्रभूला होणार नाही. आणि परमेश्वर माझ्या प्रभूचे बरे करील तेव्हा तुम्ही आपल्या दासीचे स्मरण करा.”

सामायिक करा
१ शमुवेल 25 वाचा

१ शमुवेल 25:23-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अबीगईल दाविदाला पाहून झटकन गाढवावरून उतरली व दाविदापुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातले. ती त्याच्या पाया पडून म्हणाली, “अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्याच शिरी असू द्या. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या; आपल्या दासीचे बोलणे ऐका. माझ्या स्वामींनी त्या अधम नाबालाचे काहीएक मनात आणू नये; तो आपल्या नावासारखाच आहे; त्याचे नाव नाबाल (मूर्ख) असे आहे, आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे; ज्या तरुण पुरुषांना माझ्या स्वामींनी पाठवले होते त्यांना मी पाहिले नाही. तर आता, अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरले आहे; म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामींची हानी चिंतणारे ह्यांचे नाबालासारखे होवो. मी आपल्या दासीने आपल्या स्वामींकडे जी ही भेट आणली आहे ती माझ्या स्वामींबरोबरच्या तरुणांना द्यावी. आपल्या ह्या दासीचा अपराध क्षमा करा; कारण परमेश्वर खरोखर माझ्या स्वामींचे घराणे कायमचे वसवील; कारण माझे स्वामी परमेश्वराच्या लढाया लढत आहेत; आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या ठायी कसलेही अनिष्ट आढळणार नाही. एक मनुष्य आपला पाठलाग करायला व आपला प्राण घ्यायला उठला आहे, तरी माझ्या स्वामींचा प्राण आपला देव परमेश्वर ह्याच्याजवळ जिवंताच्या समूहात बांधलेला राहील, आणि आपल्या शत्रूंचे प्राण तो जसे काय गोफणीत घालून गोफणून टाकील. आपणाविषयी जे काही परमेश्वराने म्हटले आहे त्यानुसार माझ्या स्वामींचे कल्याण करून आपणाला परमेश्वराने इस्राएलाचा अधिपती नेमल्यावर, आपण विनाकारण रक्तपात केल्याचा किंवा कोणाचा सूड उगवल्याचा आपणाला पस्तावा होणार नाही; किंवा माझ्या स्वामींच्या मनाला खेद होणार नाही; तर परमेश्वर माझ्या स्वामींचे कल्याण करील तेव्हा आपल्या दासीची आठवण करा.”

सामायिक करा
१ शमुवेल 25 वाचा