१ शमुवेल 17:20-31
१ शमुवेल 17:20-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीद पहाटेस उठला आणि एका राखणाऱ्यांकडे मेंढरे सोपवून इशायाने सांगितल्या प्रमाणे सामान घेऊन गेला. तेव्हा सैन्य रणशब्द करून लढण्यास जात असता दावीद सैन्याच्या छावणी जवळ जाऊन पोहोचला. इस्राएल व पलिष्ट्यांनी त्यांच्या सेना लढाईसाठी समोरासमोर सज्ज् केल्या. तेव्हा दावीद आपल्याजवळील सामान राखणाऱ्याच्या हाती ठेवून सैन्याकडे धावला आणि त्याने आपल्या भावांस सलाम केला. तो त्यांच्याशी बोलत असता पाहा तो युद्धवीर पलिष्टी गल्याथ नावाचा गथकर पलिष्ट्यांच्या सैन्यातून निघून मागे म्हटलेले शब्द बोलू लागला आणि ते दावीदाने ऐकले. सर्व इस्राएलांचे पुरूष त्या मनुष्यास पाहून पळाले आणि फार भ्याले. मग इस्राएलाची माणसे म्हणाली, “हा जो मनुष्य पुढे आला आहे त्यास तुम्ही पाहिले काय? तो खरेच इस्राएलाची निंदा करण्यास आला आहे. आणि जो मनुष्य ह्याला जिवे मारील त्यास राजा फार धन देईल आणि आपली कन्या त्यास देईल आणि त्याच्या बापाचे कुटुंब नामांकित करील.” तेव्हा दावीदाने आपल्याजवळ उभ्या राहिलेल्या लोकांस म्हटले, “जो मनुष्य त्या पलिष्ट्याला मारील आणि इस्राएलापासून अपमान दूर करील त्यास काय प्राप्त होईल? हा बेसुनती पलिष्टी कोण आहे की ज्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला तुच्छ मानावे?” मग लोकांनी त्यास उत्तर दिले, जो पुरुष त्यास मारील त्याचे असे करण्यात येईल. त्याचा भाऊ अलीयाब याने त्यास या लोकांशी बोलताना ऐकले; तेव्हा अलीयाब दावीदावर रागावून म्हणाला, “तू इकडे का आला आहेस? तू तो कळप रानात कोणाच्या जवळ ठेवला? तुझा गर्व आणि तुझ्या अंतःकरणाची दुष्टाई मी जाणत आहे लढाई पाहावी म्हणून तू आला आहेस. तेव्हा दावीद म्हणाला मी आता काय केले आहे? मी फक्त एक शब्द बोललो नाही काय?” मग तो त्याच्यापासून दुसऱ्याकडे फिरून तसेच भाषण करून म्हटले आणि लोकांनी त्यास पूर्वी प्रमाणे उत्तर दिले. जे शब्द दावीद बोलला ते लोकांनी ऐकले असता शौलाला सांगितले, मग त्याने त्यास बोलाविले.
१ शमुवेल 17:20-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दावीद सकाळीच उठला व शेरडेमेंढरे एका राखणार्याच्या हवाली करून इशायाने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला; सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या छावणीजवळ जाऊन पोहचला. इस्राएलांनी व पलिष्ट्यांनी आपापल्या सेना समोरासमोर आणून युद्धास सज्ज केल्या. दावीद आपल्या सामानाचे गाठोडे सामानाची राखण करणार्यांच्या हवाली करून धावत सैन्यात गेला आणि आपल्या भावांकडे जाऊन त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारले. तो त्यांच्याबरोबर बोलत असता, पलिष्ट्यांच्या गोटातून तो गथ येथील गल्याथ नावाचा पलिष्टी वीर तेथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला ते दाविदाने ऐकले. त्या पुरुषाला पाहताच सर्व इस्राएल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्यापुढून पळून गेले. इस्राएल लोक म्हणू लागले, “हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना? तो इस्राएलाची निर्भर्त्सना करायला आला आहे; जो कोणी त्याला ठार मारील त्याला राजा बहुत धन देऊन संपन्न करील, आपली कन्या त्याला देईल, आणि इस्राएलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करील.” आसपास उभे असणार्या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?” लोकांनी त्याला वरीलप्रमाणे सांगितले, म्हणजे जो कोणी त्याचा वध करील त्याला अमुक अमुक मिळेल. दावीद त्या लोकांशी बोलत होता ते त्याचा वडील भाऊ अलीयाब ह्याने ऐकले; तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, “येथे आलास कशाला? थोडीशी शेरडेमेंढरे आहेत ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेत? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे; तू केवळ लढाई पाहायला येथे आला आहेस.” दावीद म्हणाला, “मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना?” मग तो त्याच्यापासून निघून दुसर्या एकाकडे गेला व तेथेही त्याने तसेच विचारले; तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलाला कळवले; व त्याने त्याला बोलावणे पाठवले.