१ शमुवेल 15:13-26
१ शमुवेल 15:13-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शमुवेल शौलाकडे आला तेव्हा शौल त्याला म्हणाला, “परमेश्वर आपले कल्याण करो; मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे.” शमुवेल म्हणाला, “तर शेरडामेंढरांचे बेंबावणे आणि गुरांचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे ह्याचा अर्थ काय?” शौल म्हणाला, “लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत; आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवली आहेत; बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे.” शमुवेल शौलाला म्हणाला, “पुरे कर; परमेश्वर मला रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो.” तो म्हणाला, “सांगा.” शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास तरी तुला इस्राएली कुळांचा नायक केले ना? आणि तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना?” मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की, ‘जा, त्या पापी अमालेक्यांचा सर्वस्वी संहार कर, आणि ते नष्ट होत तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध कर.’ असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाहीस? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?” शौल शमुवेलाला म्हणाला, “मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे; परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग ह्याला घेऊन आलो आहे. पण ज्या लुटीचा नाश करायचा होता तिच्यातून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर ह्याला गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहेत.” तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन1 ह्यांसारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे.” तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे; कारण मी लोकांना भिऊन त्यांचे म्हणणे ऐकले. तर आता माझ्या पातकाची क्षमा करा आणि माघारी फिरून माझ्याबरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन.” शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत येणार नाही; कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारला आहे, आणि परमेश्वराने इस्राएलावरील राजपदावरून तुला झुगारले आहे.”
१ शमुवेल 15:13-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग शमुवेल शौलाकडे आला, आणि शौल त्यास म्हणाला, “परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो! मी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली आहे.” तेव्हा शमुवेल म्हणाला, “तर मेंढरांचे ओरडणे माझ्या कानी पडते व गाय-बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?” मग शौल म्हणाला, “लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली. कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती परमेश्वर तुमचा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखून ठेवली आहेत. पण आम्ही बाकीचा पूर्णपणे नाश केला.” तेव्हा शमुवेलाने शौलाला म्हटले, “तू थांब, म्हणजे या गेल्या रात्री परमेश्वराने मला काय सांगितले.” ते मी तुला ऐकवतो. शौल त्यास म्हणाला, “बोला!” मग शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्राएलाच्या वंशांचा मुख्य करण्यात आले नाही काय? आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राजा केले” परमेश्वराने तुला तुझ्या मार्गावर पाठवून सांगितले की, जा त्या पापी अमालेक्यांचा नाश कर. ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याशी लढाई कर. तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले? तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी परमेश्वराचे वचन खरोखरच पाळले व ज्या मार्गावर परमेश्वराने मला पाठवले त्यामध्ये मी चाललो आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेकाचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहे. परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी परमेश्वर तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी ठेवून घेतली.” शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे. कारण बंडखोरी जादुगीरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखा आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.” मग शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले. तर मी तुला विनंती करतो, माझ्या पापीची क्षमा कर, आणि मी परमेश्वराची आराधना करावी म्हणून माझ्याबरोबर परत ये.” शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही; कारण तू देवाचे वचन धिक्कारले, आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राज्य करण्यापासून धिक्कारले आहे.”