YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 3:8-22

1 पेत्र 3:8-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

शेवटी सर्वजण एकमनाचे व्हा आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा. तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे. कारण, “जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो त्याने वाईटापासून आपली जीभ कपटी भाषणापासून, आपले ओठ आवरावेत त्याने वाईट सोडून चांगले करावे, शांतीचा शोध करून तिला अनुसरावे. कारण परमेश्वराचे डोळे नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात पण वाईट करणार्‍यावर परमेश्वराची करडी नजर असते.” आणि तुम्ही जर चांगल्याविषयी आवेशी झाला, तर कोण तुमचे वाईट करील? पण, नीतिमत्त्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य! त्यांच्या भयाने भिऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका. पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्‍या प्रत्येक मनुष्यास सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा. आणि चांगला विवेक ठेवा; म्हणजे, तुमच्याविषयी वाईट बोलत असता, ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणार्‍यांना लाज वाटावी. कारण चांगले केल्याबद्दल तुम्ही सोसावे हे जर देवाला बरे वाटते, तर वाईट केल्याबद्दल सोसण्यापेक्षा ते अधिक बरे. कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला. आणि तो त्याद्वारे गेला व त्याने तुरूंगातल्या आत्म्यांना घोषणा केली. नोहाच्या दिवसात, तारू तयार होतेवेळी, देवाची सहनशीलता प्रतीक्षा करीत असता, पूर्वी ज्यांनी अवमान केला ते हे होते. त्या तारवात केवळ थोडे, म्हणजे आठ जीव, पाण्याकडून तारले गेले. आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा; देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो. तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.

सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा

1 पेत्र 3:8-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

सारांश, तुम्ही सर्व एकचित्ताने एकमेकांवर खर्‍या प्रीतीने व सहानुभूतीने बंधुप्रीती करणारे, दयाळू व नम्र असे व्हा. वाईटाची फेड वाईटाने किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. याउलट, वाईटाची फेड आशीर्वाद देऊन करा, कारण आशीर्वाद हे वतन मिळविण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण, “जो जीवनावर प्रीती करतो आणि चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो, तर त्यांनी आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राखावे. त्यांनी वाईटाचा त्याग करावा आणि चांगले ते करावे; त्यांनी शांतीचा यत्न करावा व तिच्यामागे लागावे. कारण प्रभूचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. परंतु प्रभूचे मुख जे वाईट करतात त्यांच्याविरुद्ध आहे.” चांगले करण्याची आस्था असेल, तर सहसा कोणी तुम्हाला अपाय करणार नाही. जर तुम्ही चांगले केल्याबद्दल सहन करता, तर तुम्ही आशीर्वादित आहात. “त्यांच्या अफवांना भिऊ नका आणि घाबरू नका.” ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना. तुमच्यामध्ये जी आशा आहे व ती का आहे, याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व आदरपूर्वक करा. आदरयुक्त, शुद्ध विवेकबुद्धीला अनुसरून राहा, म्हणजे ख्रिस्तामधील तुमच्या चांगल्या वागणुकीविरुद्ध जे लोक द्वेषभावाने बोलतात, त्यांना निंदानालस्तीची लाज वाटेल. तुम्ही दुःख सोसावे अशी परमेश्वराची इच्छा असेल, तर वाईट करून दुःख भोगण्यापेक्षा, चांगले करून दुःख सोसणे, अधिक चांगले आहे! नीतिमान असताना अनीतिमान लोकांना, तुम्हाला परमेश्वराकडे न्यावे म्हणून ख्रिस्तानेसुद्धा पापांसाठी एकदाच दुःख सोसले, शारीरिक दृष्टीने त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आत्म्यामध्ये त्यांना जिवंत केले होते. जिवंत झाल्यानंतर येशू गेले आणि बंदीशाळेतील आत्म्यांना संदेश दिला ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नव्हते; पूर्वी नोआहच्या काळामध्ये जहाज बांधले जात असताना परमेश्वराने धीराने त्यांची वाट पाहिली. त्यामध्ये असलेले फक्त थोडे लोक, सर्व मिळून आठजण पाण्यामधून वाचले होते. ते पाणी आपल्यासाठी बाप्तिस्म्याचे चित्र आहे, ते शरीराची घाण काढून नाही तर परमेश्वराकडे सदसद्विवेकबुद्धीची प्रतिज्ञा केल्याने आता तुम्हालासुद्धा वाचविते. ते तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे वाचविते. ते येशू आता स्वर्गात गेले आहेत आणि परमेश्वराच्या उजवीकडे असून सर्व स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता त्यांच्या अधीन आहेत.

सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा

1 पेत्र 3:8-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदु:खी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू व नम्र मनाचे व्हा. वाइटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या; कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. कारण,“जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाइटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावेत; त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. कारण ‘परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणार्‍यावर परमेश्वराची करडी नजर आहे.’ तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण? परंतु नीतिमत्त्वामुळे तुम्हांला दु:ख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. ‘त्यांच्या भयाने भिऊ नका व घाबरू नका’, तर ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना;’ आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या; ते सद्भाव धरून द्या, ह्यासाठी की, तुमच्याविरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणार्‍यांनी लज्जित व्हावे. कारण चांगले करूनही तुम्ही दु:ख सोसावे अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दु:ख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात2 जिवंत केला गेला; त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसांत तारू तयार होत असता देव सहन करत वाट पाहत होता त्या वेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचवण्यात आले. त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता ‘बाप्तिस्मा’ येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे, असा आहे. तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता ‘देवाच्या उजवीकडे’ आहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.

सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा

1 पेत्र 3:8-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम जपणारे, कनवाळू व नम्र वृत्तीचे व्हा. वाइटाबद्दल वाईट, शापाबद्दल शाप असे वागू नका, तर उलट आशीर्वाद द्या, आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. कारण, जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावेत, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाइटापासून आपली जीभ व खोटारडेपणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाइटाकडे पाठ फिरवून चांगले ते करावे. त्याने शांती मिळवण्यासाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. मात्र वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते. तुम्ही चांगले करण्यासाठी उत्सुक असाल, तर तुम्हांला कोण इजा करणार? परंतु नीतिमत्वामुळे तुम्हांला दुःख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. कुणाला भिऊ नका व चिंता करू नका. ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना आणि तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व सौजन्यपूर्वक द्या. तुमची सदसद्विवेकबुद्धी निर्मळ असू द्या म्हणजे तुमच्याविरुद्ध बोलणे चाललेले असता ख्रिस्तावरील तुमच्या एकनिष्ठेमुळे तुमच्या सद्वर्तनावर आक्षेप घेणाऱ्यांना लज्जित व्हावे लागेल. चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे, अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, एकदा निर्णायक स्वरूपाचे मरण सोसले. तो देहरूपात ठार मारला गेला आणि आत्म्याच्या रूपाने जिवंत केला गेला. त्या आत्मिक अवस्थेत जाऊन त्याने बंदिवान आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहनशीलतेने वाट पाहत होता, त्या वेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच होत. त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचविण्यात आले होते. त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे बाप्तिस्मा तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मल धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने परमेश्वराला दिलेले वचन असा आहे. येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश यांच्यावर तो सत्ता चालवितो.

सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा