YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 2:18-25

1 पेत्र 2:18-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

घरच्या नोकरांनो, तुम्ही पूर्ण आदराने आपल्या स्वामीच्या आज्ञेत रहा. जे चांगले आणि सहनशील असतील त्यांनाच नव्हे, पण कठोर असतील त्यांनादेखील आज्ञेत रहा कारण, जर कोणी देवाविषयी विवेक बाळगून, अन्याय सोसून, दुःख सहन करीत असेल, तर ते स्तुत्य आहे; पण तुम्ही पाप करता तेव्हा तुम्हास ठोसे दिले गेले आणि तुम्ही ते सहन केलेत तर त्यामध्ये काय मोठेपणा आहे? पण चांगले करून सोसावे लागते तेव्हा तुम्ही ते सहन केले, तर ते देवाला आवडणारे आहे. कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे. त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतःस सोपवले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्त्वाला जिवंत रहावे; त्यास बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहात.

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा

1 पेत्र 2:18-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

दासांनो, आदराने परमेश्वराचे भय बाळगून तुम्ही स्वतःला तुमच्या धन्याच्या अधीन करा, फक्त जे चांगले आणि कृपाळू आहेत अशांच्याच नाही परंतु जे कठोर आहेत अशा धन्यांच्यासुद्धा अधीन राहा. कारण जर कोणी मनुष्य त्याला परमेश्वराची जाणीव असल्यामुळे, अन्यायी दुःखाच्या वेदना सहन करतो, तर ते प्रशंसनीय असे आहे. परंतु चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही सहन केली तर त्यात काय मोठेपणा आहे? परंतु जर चांगले केल्याबद्दल तुम्ही दुःख भोगले आणि तुम्ही ते सहन केले तर हे परमेश्वराच्या दृष्टीने प्रशंसनीय आहे. यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख सहन करून तुमच्यासमोर एक आदर्श ठेवला आहे यासाठी की तुम्ही त्यांचे अनुकरण करावे. “त्यांनी कधीही पाप केले नाही; आणि त्यांच्या मुखात कोणतेही कपट आढळले नाही.” जेव्हा त्यांनी त्यांचा अपमान केला, तरी त्यांनी कधी उलट उत्तर दिले नाही, जेव्हा दुःख भोगले त्यांनी धमकाविले नाही. त्यापेक्षा त्यांनी जो न्यायीपणाने न्याय करतो त्याच्याकडे स्वतःला सोपवून दिले. त्यांच्या शरीरामध्ये त्या क्रूसावर, “त्यांनी स्वतः आमची पापे वाहिली” यासाठी की, आपण पापी स्वभाव सोडून नीतिमत्वासाठी जीवन जगावे; “त्यांना झालेल्या जखमांच्याद्वारे तुम्ही बरे झाले आहात.” कारण “मेंढरांप्रमाणे तुम्ही परमेश्वरापासून बहकून दूर गेला होता,” परंतु आता तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे आणि तुमच्या आत्म्याच्या रक्षकाकडे परत आला आहात.

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा

1 पेत्र 2:18-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण भयाने आपल्या धन्यांच्या अधीन असा; जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे, तर जे कठोर त्यांच्याही अधीन असा. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करतो तर ते उचित आहे. कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. कारण ह्याचकरता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप ‘केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.’ त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही; तर यथार्थ न्याय करणार्‍याकडे स्वतःला सोपवून दिले. ‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’ कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक1 ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात.

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा

1 पेत्र 2:18-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण आदरभावाने आपल्या धन्याच्या अधीन असा, जे कोणी चांगले व समंजस आहेत केवळ त्यांच्याच नव्हे, तर जे कठोर आहेत त्यांच्याही अधीन असा. जर कोणी अन्याय सोसताना परमेश्वराचे स्मरण ठेवून दुःख सहन करत असेल, तर देव त्याला आशीर्वाद देईल. चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे, हे देवाच्या दृष्टीने आशीर्वादपात्र आहे. ह्याचकरिता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले. तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरिता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात असत्य आढळले नाही. त्याचा अपमान होत असता, त्याने उलट अपमान केला नाही, दुःख भोगत असता, त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्यावर भिस्त ठेवली. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही क्रुसावर वाहिली, ह्यासाठी की, आपण पाप करणे सोडून देऊन सदाचरणासाठी जगावे. त्याच्या जखमांनी तुम्ही निरोगी झाला आहात. तुम्ही बहकलेल्या मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या आत्म्याचा मेंढपाळ व संरक्षक ह्यांच्याकडे तुम्हांला परत आणण्यात आले आहे.

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा