1 पेत्र 1:13-25
1 पेत्र 1:13-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका. परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा. कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे.” आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे. कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही. निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात. खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला, आणि त्याच्याद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्यास मृतांतून उठवून गौरव दिला. तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात. कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते. परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे.
1 पेत्र 1:13-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा तुम्हाला दिल्या जाणार्या कृपेवर सावध अंतःकरणाने आणि संपूर्ण विचारशीलतेने तुमची आशा ठेवा. आज्ञांकित मुलांसारखे व्हा आणि अज्ञानपणातील वाईट इच्छेला अनुसरून जसे तुम्ही पूर्वी जगत होता तसे आता जगू नका. परंतु ज्यांनी तुम्हाला पाचारण केले ते जसे पवित्र आहेत, तसेच तुम्हीही जे काही करता त्यांच्यामध्ये पवित्र असा. कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे, “तुम्ही पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.” तुम्ही ज्यांना पिता म्हणून हाक मारता ते प्रत्येक व्यक्तिच्या कामाचा निपक्षपातीपणाने न्याय करतात म्हणून तुमचे आयुष्य या जगात परदेशीयांसारखे आदरयुक्त भीतीने व्यतीत करा. तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांपासून परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून चांदी किंवा सोने अशा नाशवंत वस्तुंनी तुमची सुटका झाली नाही, परंतु निष्कलंक आणि निर्दोष असा एक कोकरा जे ख्रिस्त त्यांच्या मौल्यवान रक्ताने झाली. या जगाची निर्मिती होण्यापूर्वीच त्यांची निवड झाली होती, परंतु या शेवटच्या काळात ते तुमच्यासाठी प्रकट झाले. त्यांच्याद्वारे तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, ज्यांना परमेश्वराने मरणातून उठविले आणि त्यांचे गौरव केले आणि म्हणून तुमचा विश्वास आणि तुमची आशा परमेश्वरामध्ये आहे. आता सत्याचे आज्ञापालन करून तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे यासाठी की, तुमची एकमेकांवर खरी प्रीती असावी, आणि एकमेकांवर खोल अंतःकरणापासून प्रीती करावी. कारण नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, जिवंत आणि सर्वकाळ टिकणार्या परमेश्वराच्या वचनाद्वारे तुमचा नवीन जन्म झाला आहे. कारण, “सर्व लोक गवतासारखे आहेत, आणि त्यांचे सौंदर्य वनातल्या फुलांसारखे आहे. गवत सुकते आणि फूल कोमेजते. परंतु प्रभुचे वचन सर्वकाळ टिकते.” आणि हेच ते वचन आहे ज्याचा प्रचार तुम्हाला केला होता.
1 पेत्र 1:13-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणार्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका; तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.” जो तोंडदेखला न्याय करत नाही, तर ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही ‘पिता म्हणून हाक मारता,’ तर आपल्या प्रवासाच्या काळात भिऊनच वागा. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने व रुपे’ अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.’ ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला. तुम्ही त्याच्या द्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात; त्या देवानेच त्याला मेलेल्यांतून उठवून त्याचा गौरव केला, ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने आत्म्याच्या द्वारे शुद्ध करून घेतले आहेत, म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून म्हणजे ‘देवाच्या जिवंत व सर्वकाल टिकणार्या’ शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. कारण, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे; आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते; परंतु प्रभूचे ‘वचन सर्वकाळ टिकते.”’ ‘सुवार्तेचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले’ ते हेच होय.
1 पेत्र 1:13-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून तुम्ही तुमचे मन कृतीसाठी खंबीर करा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञाधारक मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागू नका. उलट, तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे, तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचारणात पवित्र व्हा. असा धर्मशास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’ जो तोंडदेखला न्याय करीत नाही, तर ज्याच्यात्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात त्याचा आदर राखा. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरू जो ख्रिस्त ह्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. ज्याला जगाच्या स्थापनेपूर्वीपासून निवडण्यात आले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मेलेल्यांतून उठवून त्याचा गौरव केला. ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. प्रांजल बंधुप्रेमासाठी तुम्ही स्वतःला सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहे म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सजीव व टिकणाऱ्या शब्दाद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, सर्व मानवजात गवतासारखी आहे आणि तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते. परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते. शुभवर्तमानाचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले, ते हेच होय.