१ राजे 9:3-9
१ राजे 9:3-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर त्यास म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थानाकडे माझे मन व दृष्टी सतत राहील. तुझे वडिल दावीद यांच्या प्रमाणेच चांगल्या मनाने व सरळतेने तू माझ्यासमोर चाललास व माझ्या आज्ञा नियम पाळल्यास, तर तुझ्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी इस्राएलाच्या राजासनावर येईल. तुझे वडिल दावीद याला मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांची सत्ता इस्राएलावरून कधीच खुटंणार नाही. पंरतु तू किंवा तुझ्या मुलाबाळांनी हा मार्ग सोडला व माझ्या आज्ञांचे पालन केले नाही, तुम्ही इतर दैवतांच्या भजनी लागलात, तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएलांना हुसकावून लावीन. इतर लोकात तुम्ही निंदेचा विषय होणार. हे मंदिर मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे. पण माझे आज्ञापालन केले नाहीतर ते मी नजरेआड करीन. हे मंदिर नामशेष होईल; ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचे असे का केले बरे?’ यावर इतर जण सांगतील, याला कारण या लोकांनी परमेश्वर देवाच्या त्याग केला. परमेश्वराने यांच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले. पण या लोकांनी इतर देव आपलेसे केले. त्या दैवतांच्या हे भजनी लागले. म्हणून परमेश्वराने हे अरिष्ट त्यांच्यावर आणले.”
१ राजे 9:3-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह शलोमोनला म्हणाले: “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनंती मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहे तिथे सर्वकाळासाठी माझे नाव देऊन मी ते पवित्र केले आहे. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील. “तुझ्या बाबतीत म्हणायचे तर तू आपला पिता दावीद याच्याप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे हृदयाच्या सरळतेने चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील, तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीद याला मी अभिवचन देत म्हटले होते, ‘इस्राएलच्या राजासनावर तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’ “पण जर तू किंवा तुझी संतती माझ्यापासून दूर वळली आणि मी तुला दिलेल्या आज्ञा व विधी पाळले नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली, तर जो देश मी त्यांना दिला आहे त्यातून मी इस्राएली लोकांना छेदून टाकीन आणि हे मंदिर जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. मग इस्राएल सर्व लोकांमध्ये थट्टा व निंदेचा विषय होतील. हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन तुच्छतेने म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’ तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह त्यांचे परमेश्वर, ज्यांनी या लोकांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून याहवेहने त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”
१ राजे 9:3-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर त्याला म्हणाला, “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहेस त्याला माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे; माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील. तू आपला पिता दावीद ह्याच्याप्रमाणे खर्या मनाने व सरळतेने माझ्या समक्ष चालशील, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागशील आणि माझे नियम व निर्णय पाळशील, तर इस्राएलांवरील तुझे राजासन मी कायमचे स्थापीन; तुझा पिता दावीद ह्याला मी वचन दिल्याप्रमाणे इस्राएलाच्या गादीवर बसायला तुझ्या कुळातला पुरुष खुंटायचा नाही. पण तुम्ही व तुमच्या संततीने माझे अनुसरण करण्याचे सोडल्यास, मी तुम्हांला लावून दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्यास आणि मला सोडून अन्य देवांची उपासना व भजनपूजन केल्यास, जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यातून त्यांचा उच्छेद करीन आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाकरता पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन, तसेच इस्राएल लोक इतर सर्व राष्ट्रांत दृष्टान्ताचा व निंदेचा विषय होतील. आणि हे मंदिर उंच स्थानी राहील तरी त्याच्या जवळून येणारेजाणारे चकित होतील व छीथू करून म्हणतील, परमेश्वराने ह्या देशाचे व ह्या मंदिराचे असे का केले? तेव्हा लोक म्हणतील, ‘त्यांचा देव परमेश्वर ह्याने त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून आणले असून ते त्याला सोडून अन्य देवांच्या नादी लागले व त्यांचे भजनपूजन व उपासना करू लागले, ह्यांमुळे परमेश्वराने ही सर्व विपत्ती त्यांच्यावर आणली आहे.”’