१ राजे 3:7-14
१ राजे 3:7-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझे वडिल दावीदानंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी लहान मुलासारखाच आहे. मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही. तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्यांचा जमाव मोठा आहे ते असंख्य व अगणित आहेत. म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?” शलमोनाने हा वर मागितला याचा परमेश्वरास फार आनंद झाला म्हणून देव त्यास म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस. तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तुला ज्ञानी आणि शहाणपणाचे मन देतो, तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला, नाही आणि पुढे कधी होणार नाही. आणखी तू जे मागीतले नाही तेही मी तुला देत आहे धन आणि वैभव ही तुला देत आहे. तुझ्या आयुष्यभर तुझ्यासारखा कोणी दुसरा राजा असणार नाही. जर तू माझ्या दाखवलेल्या मार्गांने चाललास आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळलेस, जसा तुझा पिता दावीद चालला, तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.”
१ राजे 3:7-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला माझा बाप दावीद ह्याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे; त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. ह्यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे म्हणजे मला बर्यावाइटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे?” शलमोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. देव त्याला म्हणाला, “तू असला वर मागितलास; दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश ह्यांपैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितलीस, म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो; मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो; तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. एवढेच नव्हे तर तू मागितला नाहीस असा आणखी एक वर तुला देतो; धन आणि वैभव हे तुला देतो; तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजांमध्ये तुझ्यासमान कोणी असणार नाही. तू आपला बाप दावीद ह्याच्याप्रमाणे माझ्या मार्गांनी चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करीन.”