१ राजे 2:1-9
१ राजे 2:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दाविदाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला आज्ञा देऊन सांगितले, “आता मी जगाच्या रीतीप्रमाणे जाणार आहे. तर तू हिमंत धर, खंबीर, जबाबदार पुरुष हो. आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर त्याच्या मार्गाने जा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम, कराराचे आदेश, व निर्णय काटेकोरपणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यामध्ये यशस्वी होशील. तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील, जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने, तुझे पुत्र चालले, तर इस्राएलाच्या राजासनावरून तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही. सरुवेचा पुत्र यवाब याने माझ्याशी काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे, शांततेच्या काळात त्याने हा रक्तपात केला आहे व त्याची तलवार खोचायचा कमरबंद आणि त्याच्या पायातले सैनिकी जोडे त्यांच्या रक्ताने रक्ताळलेले आहेत. तुझ्याजवळ असलेल्या ज्ञानाने यवाबाबरोबर, जसे तुला योग्य वाटेल तसा तू वाग व त्याचे पिकलेले केस शांतीने कबरेत उतरू देऊ नको. गिलादाच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर दया असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली. गेराचा पुत्र शिमी तुझ्याजवळ आहे हे लक्षात ठेव, तो बहूरीम मधला बन्यामिनी आहे. मी महनाईमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट शापाचे उद्गगार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्यास मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की, मी तुला तलवारीने ठार करणार नाही. पण आता त्यास तू निर्दोष समजू नकोस. तू सुज्ञ मनुष्य आहेस, त्यास काय करायचे ते तुला समजते. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचे स्नान घालून कबरेत पाठव.”
१ राजे 2:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला ताकीद देऊन म्हटले, “मी जगाच्या रहाटीप्रमाणे जाणार; तर तू हिंमत धर, मर्दुमकी दाखव. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ; त्याच्या मार्गांनी चाल; आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ; म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यशःप्राप्ती होईल. आणि माझ्यासंबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते वचन असे की, जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवील व माझ्यासमोर सत्याने व जिवेभावे चालेल तर इस्राएलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही. सरूवेचा पुत्र यवाब ह्याने माझ्याशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे; नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा हे जे इस्राएलाचे दोन सेनापती त्यांचे त्याने काय केले ते तुला ठाऊकच आहे; त्या दोघांचा त्याने घात केला. शांततेच्या समयी युद्धप्रसंगासारखा रक्तपात केला; त्यात त्याने आपला कमरबंद व आपली पायतणे भिजवली. तर तू आपल्या बुद्धीचा उपयोग कर; त्याचे पिकलेले केस अधोलोकी शांतीने उतरू देऊ नकोस. पण गिलादी बर्जिल्लय ह्याच्या पुत्रांवर कृपादृष्टी ठेव, आणि ते तुझ्या पंक्तीला बसणार्यांतले असावेत; कारण तुझा भाऊ अबशालोम ह्याच्यापासून मी पळून जात होतो तेव्हा त्याने माझ्याकडे येऊन माझी विचारपूस केली. तसेच तुझ्या पदरी बन्यामिनी गेराचा पुत्र बहूरीमकर शिमी हा आहे; मी महनाइमाला जात होतो त्या दिवशी त्याने मला भारी शिव्याशाप दिले; पण तो माझ्या भेटीला यार्देनेजवळ आला, तेव्हा मी परमेश्वराच्या नामाने त्याच्याशी आणभाक केली की मी तुझ्यावर तलवार धरणार नाही. तरी तू त्याला निर्दोष समजू नकोस; तू सुज्ञ पुरुष आहेस; त्याचे काय करावे हे तुला समजेलच; त्या पिकलेल्या केसाच्या म्हातार्याला रक्ताचे स्नान घालून अधोलोकी पाठव.”