YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 19:6-10

१ राजे 19:6-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याने पाहिले तो निखार्‍यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊनपिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसर्‍यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ, हे खा; कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे.” त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले; त्या अन्नाच्या बळावर चाळीस दिवस व चाळीस रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहचला. तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला; तेव्हा पाहा, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. तो त्याला म्हणाला, “एलीया, तू येथे काय करीत आहेस?” तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे; कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”

सामायिक करा
१ राजे 19 वाचा

१ राजे 19:6-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला. आणखी काही वेळाने तो परमेश्वराचे देवदूत दुसऱ्यांदा पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्यास स्पर्श केला आणि त्यास म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.” तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला. तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली. तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?” एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलाच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना तलवारीने मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”

सामायिक करा
१ राजे 19 वाचा