१ राजे 19:12-18
१ राजे 19:12-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला. पण तेथेही परमेश्वर नव्हता. अग्नी शमल्यावर मात्र शांत, मंजुळ स्वर ऐकू आला. एलीयाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. “एलीया, तू इथे का आला आहेस?” अशी वाणी त्यास ऐकू आली. एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आतापर्यंत मी तुझ्याच सेवेत आयुष्य घालवले आहे. पण इस्राएल लोकांनी आपला करार मोडला आहे. त्यांनी तुझ्या वेदींचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना ठार केले. मीच काय तो अजून जिवंत आहे. आणि आता ते माझ्या जिवावर उठलेत.” तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, “आता मागे जा आणि वाळवंटातून जाणाऱ्या रस्त्याने दिमिष्काला पोहोंचेपर्यंत चालत जा. दिमिष्कामध्ये जा आणि अरामाचा राजा म्हणून हजाएलला अभिषेक कर. निमशीचा पुत्र येहू याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर. आणि आबेल-महोला इथला शाफाटाचा पुत्र अलीशा याला पुढे तुझी जागा घेणारा संदेष्टा म्हणून अभिषेक कर. हजाएल अनेक पापी मनुष्यांना ठार करेल. त्याच्या तलवारीतून जे सुटतील त्यांना येहू मारील. आणि यातूनही कोणी निसटले तर त्यास अलीशा मारील. एलीया, इस्राएलमध्ये बआलापुढे कधी वाकले नाहीत असे सात हजार लोक अजूनही आहेत. यांना मी जगू देईल. त्यांनी आयुष्यात कधी बालमूर्तीचे चुंबन घेतलेले नाही.”
१ राजे 19:12-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला; पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता; त्या अग्नीनंतर शांत, मंद वाणी झाली. एलीयाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्याला वाणी ऐकू आली ती अशी, “एलीया, तू येथे काय करीत आहेस?” तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले, मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.” परमेश्वर त्याला म्हणाला, “तू परत दिमिष्काच्या रानाकडे जा, तेथे जाऊन पोहचलास म्हणजे हजाएलाला अभिषेक करून अरामावर राजा नेम. निमशीचा पुत्र येहू ह्याला अभिषेक करून इस्राएलावर राजा नेम; तसेच आबेल-महोला येथील शाफाटाचा पुत्र अलीशा ह्याला अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम. हजाएलाच्या तलवारीपासून जो सुटेल त्याला येहू मारील; आणि येहूच्या तलवारीपासून जो सुटेल त्याला अलीशा मारील. तरीपण इस्राएलातील ज्या सात हजारांनी बआलमूर्तींपुढे गुडघे टेकले नाहीत व ज्या प्रत्येकाने मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, त्यांना मी वाचवीन.”