१ राजे 18:36-42
१ राजे 18:36-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करून दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे. हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.” तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले. सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले. एलीया म्हणाला, “त्या बआलाच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसटू देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली. एलीया मग अहाब राजाला म्हणाला, “जा, आता तू तुझे खाणेपिणे उरकून घे कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे” तेव्हा अहाब राजा त्यासाठी निघाला. त्याचवेळी एलीया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तेथे पोहोंचल्यावर ओणवून, गुडघ्यात डोके घालून बसला.
१ राजे 18:36-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
संध्याकाळच्या यज्ञसमयी एलीया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, “हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, इस्राएलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे. हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच ह्यांची हृदये मागे फिरवली आहेस, ह्याची ह्या लोकांना जाणीव होऊ दे.” तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, “परमेश्वर हाच देव! परमेश्वर हाच देव!” एलीया त्यांना म्हणाला, “बआलाच्या संदेष्ट्यांना पकडा; त्यांच्यातल्या एकालाही निसटून जाऊ देऊ नका.” तेव्हा त्यांनी त्यांना पकडले; एलीयाने त्यांना खाली किशोन ओहळानजीक आणून वधले. एलीया अहाबाला म्हणाला, “ऊठ, खा, पी; विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे.” मग अहाब खाण्यापिण्यासाठी वरती गेला. इकडे एलीया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.