YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 17:7-24

१ राजे 17:7-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, “चल, सीदोनातील सारफथ नगरात जाऊन राहा; पाहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे.” त्याप्रमाणे तो सारफथ येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले; तिला हाक मारून तो म्हणाला, “मला एका भांड्यात प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये.” ती पाणी आणायला जात असताना त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, “आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये.” ती म्हणाली, “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही; मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी दोन काटक्या जमा करीत आहे; मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन; ते आम्ही खाऊ आणि मग मरू.” एलीया तिला म्हणाला, “भिऊ नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही.” तिने जाऊन एलीयाच्या सांगण्याप्रमाणे केले; तो, ती व तिचे कुटुंब ह्यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलीयाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. त्यानंतर घरधनिणीचा मुलगा आजारी पडला, त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला. तेव्हा ती एलीयाला म्हणाली, “हे देवाच्या माणसा, तुमचा माझा काय संबंध? माझ्या पातकांचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलाला मारून टाकावे म्हणून तुम्ही माझ्या घरी आला आहात का?” तो तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला घेऊन ये.” त्याने त्याला तिच्या कवेतून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछान्यावर निजवले. मग त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटले, “हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिच्यावर अरिष्ट आणलेस काय?” मग त्याने तीन वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले, “परमेश्वरा, हे माझ्या देवा, ह्या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊ दे.” परमेश्वराने एलीयाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊन तो पुनरपि जिवंत झाला. एलीया ते बालक घेऊन माडीवरून खाली आला आणि त्याला त्याच्या आईच्या हवाली करून म्हणाला, “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे.” ती स्त्री एलीयाला म्हणाली, “आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले.”

सामायिक करा
१ राजे 17 वाचा

१ राजे 17:7-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ आटला. तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला, “सीदोनामधील सारफथ येथे जाऊन राहा, तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.” तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो नगराच्या वेशीजवळ जातो तर त्यास एक स्त्री भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?” ती पाणी आणायला निघाली तेव्हा, एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!” तेव्हा ती स्त्री म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा पुत्र आणि मी जेवू आणि मग भूकेने मरु.” तेव्हा एलीया तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे, त्याची लहानशी भाकर करून मला आणून दे, मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणाला आहे, तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.” तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा पुत्र यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले. काही दिवसानंतर त्या स्त्रीचा पुत्र आजारी पडला. जिच्या मालकीचे ते घर होते, त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्वास थांबला. तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एलीया, तू तर देवाचा मनुष्य आहेस, मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?” एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्यास ठेवले. एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?” मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घालून करून प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.” एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा प्राण पुन्हा येऊन तो जिवंत झाला. एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्यास सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा पुत्र जिवंत आहे.” ती स्त्री एलीयाला म्हणाली, “तू खरोखरच देवाचा मनुष्य आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्या शब्दाद्वारे बोलतो हे आता मला कळले.”

सामायिक करा
१ राजे 17 वाचा