१ राजे 12:1-14
१ राजे 12:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यास सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते. शलमोन राजाकडून पळाल्यावर नबाटाचा पुत्र यराबाम मिसरमध्ये जाऊन राहीला होता, त्याने हे ऐकले, लोकांनी त्यास बोलावून आणले, तेव्हा यराबाम व सर्व इस्राएल लोक रहबामाकडे येऊन त्यास म्हणाले, “तुझ्या वडिलांनी कामाच्या ओझ्याखाली आम्हास भरडून काढले. आता आमचे ओझे थोडे हलके कर. आमच्यावर लादलेले मेहनतीचे जू काढ म्हणजे आम्ही तुझी सेवा करु.” रहबाम म्हणाला, “तीन दिवसानंतर मला भेटा. तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन.” मग लोक निघून गेले. शलमोन ज्यांच्याशी सल्लामसलत करत असे अशी काही वृध्द मंडळी होती. त्यांनाच राजा रहबामाने याबाबतीत सल्ला विचारला. तो म्हणाला, “या लोकांस मी काय सांगू?” यावर ही वयोवृध्द मंडळी म्हणाली, “तू आज यांचा सेवक बनलास तर तेही तुझी सेवा करतील. त्यांच्याशी प्रेमाने, समजुतीने बोललास तर तेही आयुष्यभर तुझे काम करतील.” पण रहबामाने हा सल्ला मानला नाही. आपल्या समवयस्क मित्रांना त्यांचे मत विचारले. रहबाम त्यांना म्हणाला, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीतल्यापेक्षा “या लोकांस कामाचे जू हलके करून हवे आहे. त्यांना आता मी काय सांगू, त्यांच्याशी काय बोलू?” तेव्हा ते तरुण मित्र म्हणाले, “ते लोक येऊन असे म्हणत आहेत, ‘तुझ्या वडिलांनी आमच्याकडून बेदम कष्ट करवून घेतले, तर आता आमचे जू हलके करा.’ तर तू त्यांना बढाई मारुन सांग, ‘माझ्या वडिलांच्या कंबरेपेक्षा ही माझी करंगळी जास्त मोठी आहे. माझ्या वडिलांनी तुम्हावर भारी जू लादले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हास चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी तर तुम्हास विंचवानी शिक्षा करीन.” रहबाम राजाने त्या लोकांस “तीन दिवसानी यायला” सांगितले होते. त्याप्रमाणे यराबाम व सर्व इस्राएल लोक तीन दिवसानी रहबामाकडे आले. त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले. मित्रांच्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुमच्यावर कष्टाचे जू लादले. मी तर तुम्हास आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर आसूड उगवले, पण ती तर तुम्हास विंचवानी शिक्षा करील.”
१ राजे 12:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले. जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो शलोमोन राजापासून पळून अजूनही इजिप्त देशातच होता). तो इजिप्तवरून परत आला. तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि इस्राएलची सर्व मंडळी रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले: “तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले, तर आता मजुरीचा हा कठीण भार व हे भारी जू आपण हलके करावे, म्हणजे आम्ही आपली सेवा करू.” रेहोबोअमने उत्तर दिले, “तीन दिवसांसाठी माघारी जा आणि परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले. तेव्हा त्याचा पिता शलोमोनच्या जीवनकाळात त्यांची सेवा केलेल्या वडीलजनांना रेहोबोअम राजाने विचारले, तो म्हणाला, “या लोकांना मी काय उत्तर द्यावे असे तुम्हाला वाटते?” त्यांनी उत्तर दिले, “आज जर तुम्ही त्यांचा सेवक होऊन त्यांची सेवा केली व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.” पण रेहोबोअमने वडीलजनांचा सल्ला नाकारला आणि त्याच्याबरोबर वाढलेल्या व त्याच्या सेवेत असलेल्या तरुण पुरुषांचा सल्ला घेतला. त्याने त्यांना विचारले, “जे लोक मला म्हणतात, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर घातलेले जू हलके करावे,’ त्यांना मी काय उत्तर द्यावे?” त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांनी उत्तर दिले, “हे लोक तुला म्हणाले आहेत की, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता हे भारी जू आपण हलके करावे.’ आता त्यांना सांग, ‘माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षाही जाड आहे. माझ्या पित्याने तुमच्यावर भारी जू लादले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.’ ” तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, “तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.” वडील लोकांनी दिलेल्या सल्ल्याला नाकारत राजाने लोकांना कठोरपणे उत्तर दिले, तरुणांच्या सल्ल्याचे अनुसरण करीत तो म्हणाला, “माझ्या पित्याने तुमचे जू भारी केले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.”
१ राजे 12:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल तेथे गेले होते. नबाटाचा पुत्र यराबाम हा शलमोन राजासमोरून पळून जाऊन मिसर देशात राहिला होता, तेथे त्याने हे ऐकले; आणि लोकांनी त्याला बोलावून आणले; तेव्हा यराबाम व इस्राएलाची सर्व मंडळी रहबामाकडे येऊन म्हणाली, “आपल्या बापाने आमच्यावर जू ठेवले होते ते भारी होते; तर आता आपल्या बापाने आमच्यावर लादलेले कठीण दास्य व भारी जू हलके करा म्हणजे आम्ही आपले ताबेदार होऊ.” त्याने त्यांना सांगितले, “आता जा, आणि तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.” हे ऐकून ते गेले. रहबाम राजाने आपला बाप शलमोन जिवंत असताना जी वृद्ध माणसे त्याच्या पदरी होती त्यांचा सल्ला घेतला; तो म्हणाला, “ह्या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय मसलत देता?” ते त्याला म्हणाले, “आपण ह्या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर ते आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.” ह्या वृद्ध माणसांनी दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेले जे तरुण त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला. त्याने त्यांना विचारले, “आपल्या बापाने जे जू आमच्यावर ठेवले आहे ते हलके करा, असे म्हणणार्या ह्या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत मला काय सल्ला देता?” त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुणांनी त्याला उत्तर दिले, “हे जे लोक आपल्याला म्हणतात की आपल्या पित्याने आमच्यावर भारी जू लादले होते तर आता आपण ते हलके करा, त्यांना असे सांगा की माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे. माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले ते मी आणखी भारी करणार; माझा बाप तुम्हांला आसुडांनी ताडन करत असे, तर मी तुम्हांला विंचवांनी ताडन करीन.” “तिसर्या दिवशी माझ्याकडे यावे” असे राजाने सांगितले होते, त्याप्रमाणे तिसर्या दिवशी यराबाम व सगळे लोक रहबामाकडे आले. तेव्हा राजाने लोकांना कठोरपणाने जबाब दिला आणि वृद्ध मनुष्यांनी दिलेला सल्ला टाकून, त्या तरुणांच्या सल्ल्याप्रमाणे तो त्यांना म्हणाला, “माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले होते, पण मी ते अधिक भारी करणार; माझा बाप, तुम्हांला आसुडांनी ताडन करीत असे, मी तर तुम्हाला विंचवांनी ताडन करीन.”