1 योहान 2:18-27
1 योहान 2:18-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. पण जो पवित्र त्याच्यापासून तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. तुम्हास सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हास लिहीले आहे असे नाही, तुम्हास ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही, म्हणून लिहिले आहे. येशू हा ख्रिस्त आहे असे नाकारणारा लबाड नाही काय? जो पित्याला आणि पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारतो त्यास पिता लाभत नाही पण जो पुत्राला स्वीकारतो त्यास पिता लाभला आहे. तुमच्याविषयी जे म्हणावयाचे तर, जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहो. जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते जर तुम्हामध्ये राहिले, तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये रहाल. आणि देवाने आम्हास जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय. जे तुम्हास फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे. पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हास कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही तुम्हास सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हास शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.
1 योहान 2:18-27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रिय मुलांनो, ही शेवटची घटका आहे; आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधक येत आहे, आणि आतासुद्धा अनेक ख्रिस्तविरोधक आलेले आहेत. यावरूनच आपणास समजते की ही शेवटची घटका आहे. ते आपल्यामधूनच बाहेर पडले आहेत, परंतु ते खरोखर आपले नव्हतेच. कारण ते जर आपल्यातील असते तर ते आपल्याबरोबर राहिले असते; परंतु ते गेल्याने हे सिद्ध झाले की त्यांच्यापैकी कोणीही आपल्यातील नव्हता. परंतु जो पवित्र आहे त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे आणि तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. तुम्हाला सत्य माहीत नाही म्हणून मी तुम्हास लिहितो असे नाही, परंतु ते तुम्हाला माहीत आहे आणि सत्याचा उगम असत्यापासून होत नाही. लबाड कोण आहे? जो कोणी येशू हे ख्रिस्त आहे हे नाकारतो तो. असा मनुष्य ख्रिस्तविरोधक आहे, पिता आणि पुत्र यांना तो नाकारतो. जो पुत्राला स्वीकारीत नाही त्याच्याजवळ पिता नाही; जो कोणी पुत्राला स्वीकारतो त्याच्याजवळ पितासुद्धा आहे. तुम्ही तर हे लक्षात ठेवा की, तुम्ही जे काही सुरुवातीपासून ऐकले आहे ते तुम्हामध्ये राहते. ते जर तुम्हामध्ये राहते, तर तुम्ही सुद्धा पुत्र आणि पित्यामध्ये स्थिर राहाल. त्याने आपल्याला सार्वकालिक जीवन देण्याचे अभिवचन दिले आहे. तुम्हाला भ्रमात पाडून बहकविण्याचा जे प्रयत्न करीत आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हास लिहित आहे. प्रभुपासून जो अभिषेक तुम्हाला मिळाला आहे तो तुम्हावर राहतो; आणि तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही. त्यांचा अभिषेक तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवेल. त्यांचा अभिषेक खोटा नाही तर सत्य आहे, जसे त्यांनी तुम्हाला शिकविले आहे तसे त्यांच्यामध्ये राहा.
1 योहान 2:18-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मुलांनो, ही शेवटली घटका आहे, आणि ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे. तुम्हांला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे असे नाही; तुम्हांला ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही, म्हणून लिहिले आहे. येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभला नाही; जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता लाभला आहे. तुमच्याविषयी म्हणायचे तर, जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते तुमच्यामध्ये राहो. जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते जर तुमच्यामध्ये राहिले तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. हे जे अभिवचन त्याने स्वत: आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय. तुम्हांला बहकवणार्या लोकांविषयी हे मी तुम्हांला लिहिले आहे. तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो, तेव्हा तुम्हांला कोणी शिकवण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक — तो सत्य आहे, खोटा नाही — तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हांला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.
1 योहान 2:18-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माझ्या मुलांनो, ही शेवटची घटका आहे! ख्रिस्तविरोधक येणार, असे तुम्ही ऐकले आहे त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत आणि ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटची घटका आहे. जरी आपल्यातूनच ते निघून गेले कारण ते आपले नव्हते. ते आपले असते, तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नव्हता, हे प्रकट व्हावे म्हणून ते निघून गेले. ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्ही सत्य जाणता. तुम्हांला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे, असे नाही. तुम्हांला ते कळते म्हणून आणि सत्यात कोणतीही लबाडी नसते म्हणून हे लिहिले आहे. येशू हा ख्रिस्त आहे, हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारतो, त्याला पिता लाभला नाही, जो पुत्राला स्वीकारतो त्याला पितादेखील लाभला आहे. जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले, ते तुमच्या अंतःकरणात राखून ठेवा. ते जर तुमच्यामध्ये राखून ठेवले तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. जे अभिवचन ख्रिस्ताने स्वतः आपल्याला दिले आहे, ते शाश्वत जीवन होय. तुम्हांला बहकविणाऱ्या लोकांविषयी हे मी तुम्हांला लिहिले आहे. तुमच्याविषयी म्हणावयाचे तर ख्रिस्ताकडून तुमचा जो अभिषेक झाला, त्यामुळे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो, म्हणून तुम्हांला कोणीही शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक सत्य आहे, खोटा नाही. पवित्र आत्मा तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा.