1 योहान 2:1-6
1 योहान 2:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हांपैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे. तो केवळ आमच्याच पापासाठी नव्हे तर सगळ्या जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित्त झाला आहे. जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्यास खऱ्या अर्थाने ओळखले आहे. जो कोणी असे म्हणतो, “मी देवाला ओळखतो!” परंतु त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो खोटे बोलत आहे; आणि त्याच्याठायी सत्य नाही. पण जर कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तर त्यांच्यामध्ये देवाची प्रीती पूर्णत्वास गेली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याठायी आहोत. मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशू ख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे.
1 योहान 2:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या प्रिय मुलांनो, मी तुम्हासाठी हे लिहित आहे यासाठी की तुम्ही पाप करू नये, परंतु जर कोणी पाप करतो, तर आपल्यासाठी एक कैवारी येशू ख्रिस्त, जे नीतिमान आहेत आणि ते पित्याजवळ आहेत. तेच आपल्या पापांसाठी प्रायश्चिताचा यज्ञ आहेत आणि केवळ आपल्यासाठीच नाही तर सर्व जगाच्या पापांसाठीसुद्धा आहेत. आपल्याला हे माहीत आहे की, जर आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो तर आपल्याला त्यांची ओळख झाली आहे. जो कोणी असे म्हणतो, “मी त्यांना ओळखतो,” परंतु त्यांच्या आज्ञांचे पालन करीत नाही तर तो लबाड आहे आणि सत्य त्या व्यक्तीमध्ये नाही. परंतु जर कोणी त्यांचे वचन पाळतो, तर परमेश्वरासाठी त्याची प्रीती खरोखर त्यांच्यामध्ये पूर्ण झाली आहे. यावरून आपणास समजते की आपण त्यांच्यामध्ये आहोत. जो कोणी असा दावा करतो की तो त्यांच्यामध्ये राहतो, त्याने जसे येशू राहिले तसे राहिले पाहिजे.
1 योहान 2:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांस कळून येते की, आपण त्याला ओळखतो. “मी त्याला ओळखतो” असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्या ठायी आहोत. मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणार्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे.
1 योहान 2:1-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिमान असा येशू ख्रिस्त पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि त्याच्याच साहाय्याने आपल्याला पापांची क्षमा मिळते; केवळ आपल्याच पापांची नव्हे तर सर्व जगाच्याही पापांची क्षमा मिळते. आपण देवाच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपल्याला खातरीने कळून येते की, आपण त्याला ओळखतो. “मी त्याला ओळखतो”, असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्यामध्ये सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याशी एकनिष्ठ आहोत. “मी त्याच्याशी एकनिष्ठ राहतो”, असे म्हणणाऱ्याने येशू ख्रिस्त जसा चालला, तसे स्वतःही चालले पाहिजे.