YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 1:1-7

1 योहान 1:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जे आरंभापासून होते, ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आणि न्याहाळले आहे, जे आमच्या हातांनी हाताळले त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हास घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हास प्रकट केले गेले. आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हांलाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे. तुमचा-आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही या गोष्टी तुम्हास लिहितो. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तोच आम्ही तुम्हास सांगत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही. जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.

सामायिक करा
1 योहान 1 वाचा

1 योहान 1:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जे प्रारंभीपासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिले आहे, ज्याच्याकडे आम्ही लक्षपूर्वक पाहिले आहे आणि आमच्या हातांनी स्पर्श केला आहे; जीवनाच्या वचनासंबंधी आम्ही ही घोषणा करीत आहोत. जे जीवन प्रकट झाले ते आम्ही पाहिले आहे आणि त्याचीच साक्ष देतो आणि तुमच्यासाठी सार्वकालिक जीवनाची घोषणा करतो; जे पित्याजवळ होते आणि आमच्यासाठी ते प्रकट झाले आहे. आम्ही जे पाहिले व ऐकले आहे तेच तुम्हाला सांगत आहोत, यासाठी की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर सहभागी व्हावे. आमची सहभागिता पित्याबरोबर आणि त्यांचा पुत्र येशू ख्रिस्ताबरोबर आहे. आम्ही हे लिहित आहोत यासाठी की, आमचा आनंद परिपूर्ण असावा. हा संदेश आम्ही त्यांच्याकडून ऐकला आहे आणि तो तुम्हाला घोषित करतो, परमेश्वर प्रकाश आहेत; त्यांच्यामध्ये अजिबात अंधार नाही. जर आम्ही असे म्हणतो की, आमची त्यांच्याबरोबर सहभागिता आहे आणि तरीसुद्धा अंधारात राहतो तर आम्ही खोटे बोलतो आणि खरेपणाने जगत नाही. परंतु जसे ते प्रकाशात आहेत, तसे आम्ही प्रकाशामध्ये चाललो, तर आमची एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्यांचा पुत्र येशू यांचे रक्त सर्व पापापासून आम्हाला शुद्ध करते.

सामायिक करा
1 योहान 1 वाचा

1 योहान 1:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो; ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आहे, व त्याची आम्ही साक्ष देतो; ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हांला प्रकट झाले, ते तुम्हांला कळवतो; जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हांलाही ह्यासाठी कळवतो की, तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे; आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे. तुमचाआमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हांला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही; पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.

सामायिक करा
1 योहान 1 वाचा

1 योहान 1:1-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे, होय, जे आम्ही पाहिले आहे व ज्याला आमच्या हातांनी स्पर्श केला आहे त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही लिहीत आहोत. हे जीवन दृश्यमान झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. हे शाश्वत जीवन पित्याजवळ होते व ते आम्हांला प्रकट झाले, ते तुम्हांला जाहीर करतो. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे, ते तुम्हांला ह्यासाठी कळवितो की, तुम्हीही आमच्यात सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे. आपला आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही लिहितो. जो संदेश आम्ही त्याच्याकडून ऐकला आहे, तो तुम्हांला जाहीर करतो. तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे, असे जर आपण म्हणतो व अंधारात चालतो, तर आपण खोटे बोलतो; सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे, तसे जर आपण प्रकाशात असलो, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते.

सामायिक करा
1 योहान 1 वाचा