YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 9:16-23

१ करिंथ 9:16-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण जरी मी शुभवर्तमान सांगतो, तरी अभिमान मिरवण्यास मला कारण नाही कारण मला हे करणे भाग आहे; मी शुभवर्तमान सांगणार नाही, तर मला हाय. कारण, मी हे स्वेच्छेने केले, तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुद्ध असेल, तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे. तर मग माझे वेतन काय? एवढेच की, मी शुभवर्तमान सांगताना, ते फुकट सांगावे आणि शुभवर्तमानाविषयीच्या माझ्या अधिकाराचा मी दुरुपयोग करू नये. कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावेत म्हणून मी सर्वाचा दास झालो. मी यहूद्यांना मिळविण्यास, यहूद्यांना यहुद्यांसारखा झालो; मी नियमशास्त्राधीन नसलो तरी मी नियमशास्त्राधीन असलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन असल्यासारखा झालो. (मी देवाच्या नियमाबाहेर नाही, पण ख्रिस्ताच्या नियमाखाली असल्यामुळे) मी नियमशास्त्राधीन नसलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन नसलेल्यांना नियमशास्त्राधीन नसल्यासारखा झालो. आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्वकाही करून मी कित्येकांचे तारण करावे. आणि मी हे सर्वकाही शुभवर्तमानाकरीता करतो, म्हणजे मीही तिच्यात सहभागी व्हावे.

सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा

१ करिंथ 9:16-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

कारण जर मी शुभवार्तेचा प्रचार करतो, तर मला प्रौढी मिरविण्याची गरज नाही, प्रचार करणे हे आवश्यक आहे, जर मी शुभवार्तेचा प्रचार करीत नाही तर माझा धिक्कार असो. मी प्रचार केला, तर मला त्याचे प्रतिफळ मिळेल; आणि स्वतःहून केला नाही तरी ती पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. माझा मोबदला काय आहे? तो हा की: शुभवार्तेचा प्रचार करताना तो मोफत करावा आणि शुभवार्तेचा प्रचारक म्हणून आपला अधिकार पूर्णपणे गाजवू नये. मी स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधीन नाही आणि तरीही जितक्यांना शक्य आहे तितक्यांना जिंकता यावे म्हणून मी स्वतःला सर्वांचा दास करून घेतले आहे. यहूदीयांना जिंकण्यासाठी मी यहूदीयांसारखा झालो. नियमशास्त्राधीन असणार्‍यांसाठी मीही नियमशास्त्राधीन झालो. वास्तविक मी नियमशास्त्राधीन नाही. ज्यांना नियमशास्त्र नाही, त्यांना जिंकून घेता यावे म्हणून मीही त्यांच्यासाठी नियमशास्त्र नसल्यासारखा झालो. परमेश्वराच्या नियमांपासून मी बंधमुक्त नाही परंतु ख्रिस्ताच्या नियमांनी बांधला गेलो आहे. जे अशक्त आहेत त्यांना जिंकण्यासाठी मी अशक्त झालो. मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो आहे, यासाठी की मी कसेही करून काहींचे तारण साधावे मी हे सर्व शुभवार्तेसाठी करतो यासाठी की मिळणार्‍या आशीर्वादात मलाही वाटेकरी होता यावे.

सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा

१ करिंथ 9:16-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही; कारण मला ती सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार! मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तरी माझ्यावर कारभार सोपवला आहे. तर मग माझे वेतन काय? ते हेच की, मी [ख्रिस्ताची] सुवार्ता फुकट सांगावी, अशा हेतूने की, मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावू नये. कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केले आहे. यहूदी लोक मिळवण्यासाठी मी यहूदी लोकांना यहूद्यासारखा झालो; नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता, त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. जे नियमशास्त्रविरहित आहेत त्यांना मिळवण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्रविरहित असा झालो. तरी देवाच्या नियमांबाहेर होतो असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो. दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्वकाही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. मी सर्वकाही सुवार्तेकरता करतो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे.

सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा

१ करिंथ 9:16-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मी शुभवर्तमान घोषित करतो म्हणून मला फुशारकी मारण्याचे कारण नाही; कारण मला तसा आदेश देण्यात आला आहे. मी शुभवर्तमान घोषित केले नाही, तर माझा धिक्कार असो! हे जर मी स्वेच्छेने करीत असेन, तर मला पारितोषिक मिळेल आणि स्वेच्छेने नसेल, तरी माझ्यावर ही जबाबदारी देवाने सोपवली आहे व माझे कर्तव्य म्हणून मी ती पार पाडीत आहे. तर मग माझे पारितोषिक काय? माझे पारितोषिक ते हेच की, शुभवर्तमान विनामूल्य सांगण्याची जी संधी मला मिळाली आहे, ती पार पाडताना मला जे काम करावे लागते त्याबाबतच्या माझ्या हक्कांचा मी दावा करत नाही. कारण मी सर्वार्थाने स्वतंत्र असूनही, अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केले आहे. यहुदी लोक मिळवण्यासाठी मी यहुदी लोकांमध्ये यहुदी माणसासारखा राहतो; नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसताही, त्यांच्यासारखा झालो. जे नियमशास्त्राच्या बाहेर आहेत त्यांना मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राच्या बाहेर असा झालो. मी देवाच्या नियमांबाहेर होतो असे नाही, तर मी ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन होतो. दुर्बलांना मिळवण्यासाठी मी दुर्बल झालो. मी सर्व प्रकारे कित्येक जणांचे तारण साधावे म्हणून मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे. मी शुभवर्तमानामुळे मिळणाऱ्या आशीर्वादात सहभागीदार व्हावे म्हणून, मी सर्व काही शुभवर्तमानाकरिता करतो.

सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा