१ करिंथ 7:2-5
१ करिंथ 7:2-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे. एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला परीक्षेत पाडू नये.
१ करिंथ 7:2-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरीही व्यभिचार होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला आपली स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला आपला स्वतःचा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा; आणि त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला तिच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पतीला असतो; आणि त्याचप्रमाणे पतीलाही त्याच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पत्नीला असतो. विषयसुखासाठी एकमेकाला वंचित करू नका, तुम्हास प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास मोहात पाडू नये.
१ करिंथ 7:2-5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरी जारकर्म वाढले आहे म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी संबंध ठेवावे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पतीशी. विवाहित स्त्री म्हणून असलेले सर्व हक्क पुरुषाने आपल्या पत्नीला द्यावेत, आणि पत्नीनेही आपल्या पतीसाठी तसेच करावे. पत्नीच्या शरीरावर तिचा स्वतःचा अधिकार नाही तर, पतीचा असतो. त्याचप्रमाणे पतीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो तर तो त्याच्या पत्नीला असतो. एकमेकांची वंचना करू नका, पण प्रार्थनेला वेळ मिळावा म्हणून एकमेकांच्या संमतीने काही काळ अलिप्त राहा. पण तुम्ही पुन्हा एकत्र यावे म्हणजे आत्मसंयमनाच्या अभावी सैतान तुम्हाला मोहात पाडणार नाही.
१ करिंथ 7:2-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु अनैतिकता इतकी बोकाळत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा व एकमेकांचे समाधान करावे. पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे आणि त्याचप्रमाणे पतीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे. एकमेकांना नकार देऊ नका, तरी प्रार्थना करता यावी म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला मोहात पाडू नये.