१ करिंथ 6:13-20
१ करिंथ 6:13-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण व्यभिचारासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. आणि देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालासुद्धा उठवील. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हास माहित नाही काय? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वेश्येचे अवयव करू काय? तसे न होवो. तुम्ही हे जाणत नाही का की, जो वेश्येशी जोडला जातो तो तिच्याशी शरीराने एक होतो? कारण तो म्हणतो की, ती दोघे एकदेह होतील. पण जो प्रभूशी जोडला जातो तो त्याच्याशी आत्म्याने एकरूप होतो. व्यभिचारापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरीराबाहेर होते पण व्यभिचार करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही? कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.
१ करिंथ 6:13-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही म्हणता, “अन्न पोटासाठी आणि पोट अन्नासाठी आहे, पण परमेश्वर या दोघांचाही नाश करतील.” शरीर लैंगिक अशुद्धतेसाठी नाही तर प्रभुसाठी आहे आणि प्रभू शरीरासाठी आहे. ज्याप्रमाणे प्रभुला परमेश्वराने आपल्या शक्तीने मरणातून उठवले, त्याप्रमाणेच तो आपल्यालाही उठवेल. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तेव्हा मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव घेऊन तो वेश्येशी एक करावा काय? कधीच नाही! जर कोणी वेश्येबरोबर जोडला जातो, तेव्हा ती त्याच्या शरीराचा भाग होते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण शास्त्रलेख सांगतो की, “ती दोघे एकदेह होतील.” परंतु जो कोणी प्रभुशी जडला आहे तो आत्म्याने त्यांच्याशी एक झाला आहे. व्यभिचाराच्या पापापासून दूर पळा, कारण दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते शरीराबाहेर करतो, परंतु जो कोणी व्यभिचार करतो, तेव्हा तो स्वतःच्याच शरीराविरुद्ध पाप करतो. तुमचे शरीर परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि ते तुमच्यामध्ये राहतात, हे तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही स्वतःचे नाही; कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे, म्हणून तुमच्या शरीराने परमेश्वराचे गौरव करा.
१ करिंथ 6:13-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे;” पण त्या दोहोंचाही अंत देव करील. पण शरीर जारकर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे; आणि शरीरासाठी प्रभू आहे. देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिणीचे अवयव करावेत काय? कधीच नाही! जो कसबिणीशी जडला तो व ती एकशरीर आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? कारण “ती दोघे एकदेह होतील” असे तो म्हणतो. परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत. जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही; कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपले शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा.
१ करिंथ 6:13-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, तरीही त्या दोहोंचाही अंत देव करील. शरीर जारकर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते वेश्येचे अवयव करावेत काय? कधीच नाही! जो वेश्येशी संबंध ठेवतो, तो तिच्याबरोबर एकशरीर होतो, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? कारण ‘ती दोघे एकदेह होतील’, असे धर्मशास्त्र म्हणते. परंतु जो प्रभूशी नाते जोडतो, तो आध्यात्मिकरीत्या त्याच्याशी एकरूप होतो. जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो, ते शरीराबाहेरून होते. परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीरामध्ये पाप करतो. तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही स्वतःचे मालक नाही. तर तुम्ही प्रभूचे आहात; कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करा.