YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 15:50-58

१ करिंथ 15:50-58 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आता बंधूंनो मी हे सांगतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पाहा! मी तुम्हास एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मरणाधीन आहे त्याने अमरपण परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे व हे जे मरणाधीन आहे त्याने अमरत्व धारण करावे, असे जेव्हा होईल तेव्हा, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे; “विजयात मरण गिळले गेले आहे.” “अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरणा, तुझी नांगी कोठे आहे?” मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्रापासून येते. पण देवाला धन्यवाद असो, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हास विजय देतो! म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.

सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा

१ करिंथ 15:50-58 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

माझ्या बंधू व भगिनींनो मी तुम्हाला जाहीर करतो की रक्त व मांस यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे नाशवंताला अविनाशी वतन मिळू शकत नाही. ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ. कारण नाशवंताने अविनाशीपणाला धारण केले पाहिजे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केलेच पाहिजे. जेव्हा जे नाशवंत आहे ते अविनाशीपण परिधान करेल, आणि जे मर्त्य आहे ते अमरत्व, तेव्हा हे शास्त्रलेखातील वचन सत्य होईल: “विजयाने मृत्यूला गिळंकृत केले आहे.” “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?” कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात. यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलीत होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभुच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभुमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.

सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा

१ करिंथ 15:50-58 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा “मरण विजयात गिळले गेले आहे” असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?” मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे; परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2

सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा

१ करिंथ 15:50-58 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि जे मर्त्य आहे त्याला अमरत्व मिळू शकत नाही. ऐका, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच मरणार नाही, मात्र आपण सर्व जण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, मेलेले ते अविनाशी स्वरूपात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे आवश्यक आहे. विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा ‘मरण विजयात गिळले गेले आहे’ असा जो धर्मशास्त्रलेख आहे, तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला विजयी करतो त्याला धन्यवाद! म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, स्थिर आणि अढळ राहा. प्रभूच्या कार्यात सतत मग्न राहा; कारण तुम्ही जाणून आहात की, प्रभूमध्ये तुम्ही केलेले श्रम कधीच व्यर्थ ठरणार नाहीत.

सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा