१ करिंथ 15:3-7
१ करिंथ 15:3-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी महत्त्वाचे हे आहे की, शास्त्रलेखाप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांसाठी मरण पावला. त्यास पुरण्यात आले व शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्यास पुन्हा उठविण्यात आले. व तो केफाला दिसला, नंतर बारा प्रेषितांना, नंतर तो एकाच वेळी पाचशेहून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मरण पावले आहेत. नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला.
१ करिंथ 15:3-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रथम महत्वाचे म्हणजे जे मी स्वीकारले तेच तुम्हाला सांगत आलो आहे आणि ते म्हणजे वचनांनुसारः ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावले. त्यांना पुरण्यात आले आणि तीन दिवसानंतर त्यांना शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे कबरेतून पुन्हा उठविण्यात आले, आणि केफाला त्यांचे पहिल्यांदा दर्शन घडले, आणि नंतर बारा शिष्यांना. त्यानंतर पाचशेपेक्षा अधिक बंधू व भगिनींना एकाच वेळी त्यांचे दर्शन घडले, त्यातील बहुतेक आजही जिवंत असले, तरी काहीजण मरण पावले आहेत. याकोबाला आणि नंतर सर्व प्रेषितांना त्यांचे दर्शन झाले.
१ करिंथ 15:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की,3 शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसर्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले; आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यांच्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला
१ करिंथ 15:3-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मला जे मिळाले, ते मी अत्यंत महत्त्वाचे समजून तुमच्या सुपूर्त केले, म्हणजेच पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांसाठी मरण पावला. तो पुरला गेला आणि धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. तो प्रथम पेत्राला व नंतर बारा जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यांतील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, परंतु काही निधन पावले आहेत. त्यानंतर तो याकोबला व पुढे सर्व प्रेषितांना दिसला