१ करिंथ 15:20-34
१ करिंथ 15:20-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्यांतले प्रथमफळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील; पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी. नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल. कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. कारण “त्याने सर्व अंकित करून त्याच्या पायांखाली ठेवले.” परंतु “सर्व अंकित केले आहे” असे जेव्हा म्हटले तेव्हा, ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही हे उघड आहे. त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.1 असे नसल्यास मेलेल्यांखातर जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत तर त्यांच्याखातर ते बाप्तिस्मा का घेतात? आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घालतो? बंधुजनहो, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या ठायी मला तुमच्याविषयी जो अभिमान आहे त्याला स्मरून मी प्रतिज्ञेवर सांगतो की, मी रोज रोज मरतो. मनुष्यस्वभावाप्रमाणे म्हणायचे तर इफिसात मी श्वापदांबरोबर लढाई केली ह्यात मला काय लाभ? मेलेले उठवले जात नाहीत, “तर चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या मरायचे आहे.” फसू नका, “कुसंगतीने नीती बिघडते.” नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका; कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही; हे मी तुम्हांला लाजवण्यासाठी बोलतो.
१ करिंथ 15:20-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मरण पावलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथमफळ आहे. कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमाणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले. कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. पण प्रत्येकजण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथमफळ आहे आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले लोक जिवंत केले जातील. मग शेवट होईल, प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल. कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायांखाली ठेवीपर्यंत त्यास राज्य केले पाहिजे. जो शेवटचा शत्रू मृत्यू तो नष्ट केला जाईल. पवित्र शास्त्र सांगते, “कारण देवाने, त्याच्या पायाखाली सर्व गोष्टी अंकित केल्या आहेत.” पण जेव्हा तो म्हणतो की, “सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या आहेत,” तेव्हा ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या, तो स्वतः बाहेर आहे हे उघड आहे. आणि, जेव्हा सर्व गोष्टी त्यास वश होतील तेव्हा पुत्र स्वतः त्या सर्व गोष्टी आपल्या वश करणार्याला वश होईल. म्हणजे देवपिता हाच सर्वात सर्व असावा. नाही तर, जे लोक मरण पावल्यांसाठी बाप्तिस्मा घेतात ते काय साधतील? जर मरण पावलेले उठविलेच जात नाहीत तर ते लोक त्यांच्याविषयी बाप्तिस्मा का घेतात? आणि आम्ही सुद्धा प्रत्येक वेळी संकटात का पडतो? बंधूंनो ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याठायी, मला तुमच्याविषयी असलेल्या अभिमानाची शपथ घेऊन मी हे म्हणतो की, मी रोज रोज मरतो. मनुष्य स्वभावाप्रमाणे इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मरण पावलेले उठवले जात नाहीत तर चला “आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरावयाचे आहे!” फसू नका, “वाईट सोबतीने चांगल्या सवयी बिघडतात.” नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करीत जाऊ नका कारण तुम्हापैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.
१ करिंथ 15:20-34 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु निश्चित ख्रिस्त मेलेल्यातून उठविले गेले आहेत; जे निद्रा पावलेले आहेत त्यांतील ते प्रथमफळ आहे. कारण जसा एका मनुष्याद्वारे मृत्यू आला, तसाच या एका मनुष्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण आदामामध्ये सर्व मरण पावतात, तसेच ख्रिस्तामुळे सर्व जिवंत करण्यात येतील प्रत्येकजण आपआपल्या क्रमाप्रमाणे उठेल: प्रथमफळ ख्रिस्त; नंतर जेव्हा ते येतील तेव्हा जे त्यांचे आहेत ते उठतील. नंतर शेवट होईल, त्यांनी सर्व सत्ता, अधिकार आणि सामर्थ्य नष्ट केल्यावर ख्रिस्त आपले राज्य परमेश्वर पित्याला सोपवून देतील. कारण त्यांचे सर्व शत्रू पायाखाली ठेवीपर्यंत त्यांना राज्य करणे भाग आहे. शेवटचा शत्रू जो मृत्यू, त्याचाही नाश केला जाईल. कारण त्यांनी “सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या आहेत.” आता जेव्हा असे म्हटले आहे की, “सर्वकाही” त्यांच्या अधिकाराखाली ठेवले आहे, यावरून स्पष्ट होते की ज्यांनी “सर्वकाही” ख्रिस्ताच्या अधीन केले आहे आणि त्या सर्वकाहीमध्ये परमेश्वराचा समावेश नाही. हे सर्व त्यांनी केल्यानंतर, पुत्र स्वतः त्यांच्या अधीन होईल ज्या परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या स्वाधीन केले आहे, यासाठी की परमेश्वराने सर्वात सर्वकाही व्हावे. जर पुनरुत्थान नाही, तर काहीजणांनी मृतांच्यावतीने बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी काय करावे? जर मृत झालेले पुन्हा कधीच जिवंत होणार नसतील तर लोकांनी त्यांच्याबद्दल बाप्तिस्मा घेण्याची काय गरज आहे? आणि प्रत्येक वेळेस आम्ही तरी आमचे प्राण धोक्यात का घालावे? निश्चित, मी दररोज मृत्यूला तोंड देतो. मला ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो. जर पृथ्वीवरील आशेने इफिस येथील हिंस्र पशूंशी मनुष्यांसारखे लढण्यात आले तर मला काय लाभ झाला? जर मेलेले पुन्हा जिवंत होणार नाही तर, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत.” तुम्ही फसवले जाऊ नका: “वाईटाची संगती चांगल्या चरित्रांना बिघडवते.” तुम्ही शुद्धीवर यावयास हवे आणि पाप करणे सोडून द्या; पण परमेश्वरासंबंधात काहीजण अज्ञानी आहेत मी हे तुम्हाला लाज वाटावी म्हणून बोलतो.
१ करिंथ 15:20-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु वस्तुस्थिती ही आहे की, ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे. जे मरण पावले आहेत त्यांतला तो प्रथम फळ आहे. खरोखर ज्याअर्थी मरण मनुष्याद्वारे आहे त्याअर्थी मेलेल्यांचे पुनरुत्थान मनुष्याद्वारे आहे. जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे:प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे आहेत, ते त्याच्या आगमनकाळी. नंतर शेवट होईल, त्यावेळी प्रत्येक अधिकार व प्रत्येक सामर्थ्यही तो नष्ट करील व राज्य देवपित्याच्या स्वाधीन करील; कारण त्याच्या पायांखाली सर्व शत्रू आणेपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. पवित्र शास्त्रात म्हटले आहे, ‘देवाने सर्व अंकित करून त्याच्या पायांखाली ठेवले.’ परंतु सर्व अंकित केले आहे, असे जेव्हा म्हटले तेव्हा, ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही, हे उघड आहे. त्याच्या अंकित सर्व काही झाले, असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की, देव सर्वांना सर्व काही होवो. असे नसल्यास मेलेल्यांच्या वतीने जे बाप्तिस्मा घेतात त्यांचे काय? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत, तर त्यांच्या वतीने लोक बाप्तिस्मा का घेतात? आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घातला असता? बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधे मला तुमच्याविषयी जो अभिमान वाटतो त्याला स्मरून मी खरोखर सांगतो की, मी रोज मृत्यू स्वीकारतो! जर केवळ मानवी आकांक्षेनुसार इफिस येथे मी श्वापदांना झुंज दिली, तर त्यात मला काय मिळाले? मेलेले उठवले जात नाहीत, तर धर्मशास्त्रानुसार ‘चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या आपण मरणार.’ फसू नका; कुसंगतीने शील बिघडते, नीतिमत्ता म्हणजे काय, ह्याबद्दल शुद्धीवर या आणि विवेकबुद्धीने वागा. पाप करू नका; कारण कित्येकांना देवाची ओळख नसते. तुम्हांला शरम वाटावी म्हणून मी हे बोलतो.