१ करिंथ 13:4-13
१ करिंथ 13:4-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते. प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते. प्रीती कधीच संपत नाही; भविष्यवाण्या असतील त्या निरुपयोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशा होतील, ज्ञान असेल ते नाहीसे होईल; कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो. पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल. जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा समजत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतःकळते, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, तसे मी पूर्णपणे ओळखीन, सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतात. पण यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे.
१ करिंथ 13:4-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही. प्रीती वाईट गोष्टींमध्ये आनंद मानत नाही परंतु सत्यामध्ये आनंद मानते. प्रीती नेहमी संरक्षण करते, सर्वदा विश्वास ठेवते, सर्वदा आशा धरते आणि सर्वदा धीर धरते. भविष्यनिवेदन करण्याचे दान समाप्त होईल, वेगवेगळी भाषा बोलण्याचे दान स्तब्ध होईल आणि बुद्धीचे ज्ञान नाहीसे होईल; परंतु प्रीती अखंडपणे टिकून राहील. कारण आपल्याला थोडेच कळते, आपल्याला संकल्पाचेही ज्ञान थोडे आहे. परंतु पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर, जे अपूर्ण आहे ते नाहीसे होईल. मी बालक होतो, तेव्हा माझे बोलणे, विचार करणे, विवाद करणे बालकासारखे होते. परंतु जेव्हा मी प्रौढ झालो, तेव्हा लेकरांसारखे वागणे मी सोडून दिले आहे. कारण आपण आता केवळ आरशात प्रतिबिंब पाहत आहोत; नंतर आपण समोरासमोर पाहणार आहोत. मला आता केवळ अंशतः कळते; नंतर मला सर्वकाही स्पष्ट असे दिसेल, जशी माझी संपूर्ण ओळख झाली आहे. विश्वास, आशा, प्रीती या तीन गोष्टी टिकून राहतात; परंतु त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे.
१ करिंथ 13:4-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते; ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही; संदेश असले तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो; पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन. सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.
१ करिंथ 13:4-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, फुशारकी मारत नाही, गर्वाने फुगत नाही, ती सभ्यता सोडून वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती दुष्कृत्यात आनंद मानत नाही, तर सत्यात आनंद मानते. प्रीती सर्व गोष्टींत चिकाटी सोडत नाही आणि सर्व गोष्टींवर श्रद्धा ठेवते, सर्व गोष्टींत आशा बाळगते व सर्व गोष्टींत धीर कायम ठेवते. प्रीती शाश्वत स्वरूपाची आहे. परंतु संदेश असले, तरी ते कालबाह्य होतील. अपरिचित भाषांची कृपादाने असली, तरी त्यांना अंत आहे आणि विद्या असली, तरी ती संपुष्टात येईल; कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि आपल्याला अंशतः संदेश देता येतो. पण जे परिपूर्ण ते आल्यावर, अपूर्ण ते नष्ट होईल. मी मूल होतो, तेव्हा माझे बोलणे, माझ्या भावना व माझे विचार मुलासारखे असायचे. आता प्रौढ झाल्यावर मी बालिशपणा सोडून दिला आहे. ह्री आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते, ते अपूर्ण आहे. पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन. सारांश, विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यांत प्रीती अधिक महान आहे.