१ करिंथ 10:14-22
१ करिंथ 10:14-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा, माझ्या प्रियांनो, मूर्तीपूजा टाळा. मी तुमच्याशी बुद्धीमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा. जो “आशीर्वादाचा प्याला” आम्ही आशीर्वादित करण्यास सांगतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागीतेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळजण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. देहासंबंधाने इस्राएल राष्ट्राकडे पाहा. जे अर्पण केलेले खातात ते वेदीचे भागीदार आहेत नाही का? तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे? नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण देवरहित परराष्ट्रीय लोक करतात ते अर्पण भूतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही. तुम्ही देवाचा आणि भूतांचाही असे दोन्ही प्याले पिऊ शकत नाही. तुम्ही प्रभूच्या मेजाचे आणि भुताच्या मेजाचे भागीदार होऊ शकत नाही. आपण प्रभूला ईर्षेस पेटविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही. तुमचे स्वातंत्र्य देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा.
१ करिंथ 10:14-22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, माझ्या प्रिय मित्रांनो, मूर्तीपूजेपासून दूर पळा. मी बुद्धिमान लोकांबरोबर बोलतो; मी जे तुम्हाला सांगत आहे त्याची पारख तुम्हीच करा. उपकारस्तुतिचा प्याला ज्याबद्दल आपण उपकारस्तुती करतो ती ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सहभागिता नाही का? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराशी सहभागिता नाही का? कारण भाकर एक आहे, आम्ही पुष्कळ जण असलो तरी एक शरीर आहोत, आपण सर्वजण एकाच भाकरीचे सहभागी आहोत. इस्राएल लोकांचा विचार करा: वेदीवर अर्पण केलेले यज्ञबली जे खातात, ते वेदीशी सहभागी होतात की नाही? मूर्तींना अर्पिलेल्या अन्नास काही महत्व आहे किंवा मूर्तीला काही महत्व आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे काय? नाही! गैरयहूदीय लोक परमेश्वराला यज्ञ अर्पण करीत नसून भुतांना अर्पण करतात आणि भुतांशी तुम्ही सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही प्रभुचा प्याला आणि भुतांचा प्याला यातून एकाच वेळी पिऊ शकणार नाही. तसेच प्रभुचा मेज आणि भुतांचा मेज या दोन्हीमध्ये तुम्हाला एकाच वेळी सहभागी होता येत नाही. प्रभुला ईर्षेस पेटवावे असा प्रयत्न आपण करतो काय? आपण त्यांच्यापेक्षा शक्तिमान आहोत काय?
१ करिंथ 10:14-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा. तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो; मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. जे जात्याच इस्राएल त्यांच्याकडे पाहा; यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य काहीतरी आहे, अथवा मूर्ती काहीतरी आहे, असे माझे म्हणणे आहे काय? नाही; तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ‘ते देवाला नव्हे तर भुतांना करतात’; आणि तुम्ही भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला व भुतांचाही प्याला पिववत नाही; ‘प्रभूच्या मेजावरचे’ व भुतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही. आपण ‘प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय?’ आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय?
१ करिंथ 10:14-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा. तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो, मी काय म्हणतो त्याचा निर्णय तुम्हीच करा. जो प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्तामधील सहभाग नाही काय? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीरामधील सहभागिता नाही काय? भाकर एक असल्यामुळे, आपण जरी अनेक असलो तरी त्या एका भाकरीत सहभागी झाल्यामुळे, आपण एक शरीर असे आहोत. जे जात्याच इस्राएली आहेत त्यांच्याकडे पाहा: यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार असतात ना? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य महत्त्वाचा की, मूर्ती महत्त्वाची? तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भुतांना करतात. तुम्ही भुतांचे भागीदार व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही प्रभूचा प्याला व भुतांचा प्याला पिऊ शकत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भुतांच्या मेजावरचे तुम्ही खाऊ शकत नाही. आपण प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय?