YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 29:10-22

१ इतिहास 29:10-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.” हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही सर्व तुझीच आहेत कारण आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते तुझेच आहे. हे परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सगळ्याहून उच्च पदास पोहचलेला तूच आहेस. संपत्ती आणि सन्मानही तुझ्याकडून आहेत. तूच सर्वांवर अधिकार करतोस. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे. देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो. या सगळ्या गोष्टी स्वखुशीने अर्पण करण्याची शक्ती असणारा मी कोण? किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळाले तेच आम्ही तुला परत करत आहोत. आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा परदेशी व प्रवासी आहोत. आमचे पृथ्वीवरचे दिवस सावलीसारखे आहेत आणि पृथ्वीवर टिकून राहण्याची काही आशा नाही. हे परमेश्वरा, आमच्या देवा, तुझ्या पवित्र नावाच्या सन्मानासाठी तुझे मंदिर बांधायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या. ही सामग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. जे आहे ते सगळे तुझेच आहे. हे देवा, लोकांची अंतःकरणे तू पारखतोस आणि सरळपण तुला आवडते हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामाणिक मनाने हे सगळे तुला आनंदाने अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू स्वखुशीने अर्पण केल्या आहेत हे मी आनंदाने पाहिले आहे. हे परमेश्वर अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा तूच देव आहेस. तू आपल्या लोकांच्या अंतःकरणाच्या ठायी हे विचार व या कल्पना निरंतर राहतील व त्यांची मने तुझ्याकडे लागतील असे कर. माझा पुत्र शलमोन याने तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे अंतःकरणपूर्वक पालन करावे, आणि या सर्व गोष्टी कराव्या आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे. तेथे जमलेल्या सर्व लोकांस दावीद म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वरास लोकांनी धन्यवाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले. दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. एक हजार बैल, एक हजार एडके, एक हजार कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलासाठी त्यांनी आणखीही पुष्कळच यज्ञ केले. मग परमेश्वरासमोर सर्व लोकांनी मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. दावीदाचा पुत्र शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राजा म्हणून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकाला अभिषेक केला गेला.

सामायिक करा
१ इतिहास 29 वाचा

१ इतिहास 29:10-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

दाविदाने सर्व मंडळीदेखत परमेश्वराचा धन्यवाद केला; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, आमचा पिता इस्राएल ह्याच्या देवा, तू सदासर्वकाळ धन्य आहेस. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच; हे परमेश्वरा; राज्यही तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुझ्यापासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करतोस; सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत; लोकांना थोर करणे व सर्वांना सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. आम्हांला ह्या प्रकारे स्वेच्छेने अर्पणे करता यावीत असा मी कोण? व माझे लोक तरी कोण? सर्वकाही तुझ्यापासूनच प्राप्त होते; तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. आम्ही आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यासमोर उपरे व परदेशी आहोत; ह्या भूतलावरील आमचे दिवस छायेप्रमाणे असतात; आमची काही शाश्वती नाही. हे परमेश्वरा, आमच्या देवा, हा जो मोठा निधी आम्ही तुझ्या पवित्र नामाचे मंदिर बांधण्यासाठी जमवला आहे हा तुझ्याच हातून आम्हांला मिळाला आहे; हा सर्व तुझाच आहे. माझ्या देवा, मला ठाऊक आहे की, तुला हृदयाची पारख आहे; सरळता तुला पसंत आहे; मी तर आपल्या सरळ हृदयाने ह्या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पित केल्या आहेत; तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वेच्छेने तुला अर्पणे केली आहेत हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे. हे परमेश्वरा, आमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, तुझ्या प्रजाजनांच्या हृदयाच्या ठायी हे विचार व ह्या कल्पना निरंतर वागतील व त्यांची मने तुझ्याकडे नेहमी लागतील असे कर. माझा पुत्र शलमोन ह्याला असे सात्त्विक मन दे की त्याने तुझ्या आज्ञा, तुझे निर्बंध व तुझे नियम पाळून हे सर्वकाही करावे आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे.” मग दावीद सर्व मंडळीला म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करा.” तेव्हा सर्व मंडळीने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला आणि आपली मस्तके लववून परमेश्वराला व राजाला वंदन केले. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ केले व होमबली अर्पण केले; त्यांनी एक हजार बैल, एक हजार एडके व एक हजार कोकरे पेयार्पणांसहित अर्पून सर्व इस्राएलासाठी विपुल यज्ञ केले; त्यांनी त्या दिवशी परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलमोन ह्याला दुसर्‍यांदा राजा नेमून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी त्याला व याजकाच्या कामासाठी सादोकाला अभिषेक केला.

सामायिक करा
१ इतिहास 29 वाचा

१ इतिहास 29:10-22

१ इतिहास 29:10-22 MARVBSI१ इतिहास 29:10-22 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा