१ इतिहास 29:1-22
१ इतिहास 29:1-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “माझा पुत्र शलमोन यालाच देवाने निवडले आहे. तो अजून सुकुमार व अनुभवी आहे. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे भवन काही मनुष्यांसाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे. माझ्या देवाच्या मंदिरासाठी मी माझ्या शक्तीने सर्वोत्तम सोन्याच्या वस्तूंसाठी सोने व चांदीच्या वस्तूसाठी चांदी, पितळेच्या वस्तूसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड, जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि संगमरवरी दगड हे ही विपुलतेने दिले आहे. आता कारण मी माझे चित्त देवाच्या मंदिराकडे लावले आहे. म्हणून पवित्र मंदिरासाठी मी जी ही तयारी केली त्याशिवाय आणखी माझा वैयक्तिक सोन्या, रुप्याचा ठेवाही देत आहे. तीन हजार किक्कार ओफीरचे शुध्द सोने, सात हजार किक्कार निर्भेळ रुपे मी दिले. मंदिराच्या भिंती या रुप्याने झाकायच्या आहेत. कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोने व रुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलीं पैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?” तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल वंशाचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या. देवाच्या निवासस्थानाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पाच हजार किक्कार सोने, दहा हजार किक्कार रुपे, अठरा हजार किक्कार पितळ, आणि एक लाख किक्कार लोखंड दिले. ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्या हाती ती दिली. या सर्व लोकांनी अगदी मनापासून स्वखुशीने परमेश्वरास अर्पण दिले. त्यामुळे सर्वानी आनंद केला. राजा दावीदही फार आनंदीत झाला. त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.” हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही सर्व तुझीच आहेत कारण आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते तुझेच आहे. हे परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सगळ्याहून उच्च पदास पोहचलेला तूच आहेस. संपत्ती आणि सन्मानही तुझ्याकडून आहेत. तूच सर्वांवर अधिकार करतोस. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे. देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो. या सगळ्या गोष्टी स्वखुशीने अर्पण करण्याची शक्ती असणारा मी कोण? किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळाले तेच आम्ही तुला परत करत आहोत. आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा परदेशी व प्रवासी आहोत. आमचे पृथ्वीवरचे दिवस सावलीसारखे आहेत आणि पृथ्वीवर टिकून राहण्याची काही आशा नाही. हे परमेश्वरा, आमच्या देवा, तुझ्या पवित्र नावाच्या सन्मानासाठी तुझे मंदिर बांधायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या. ही सामग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. जे आहे ते सगळे तुझेच आहे. हे देवा, लोकांची अंतःकरणे तू पारखतोस आणि सरळपण तुला आवडते हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामाणिक मनाने हे सगळे तुला आनंदाने अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू स्वखुशीने अर्पण केल्या आहेत हे मी आनंदाने पाहिले आहे. हे परमेश्वर अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा तूच देव आहेस. तू आपल्या लोकांच्या अंतःकरणाच्या ठायी हे विचार व या कल्पना निरंतर राहतील व त्यांची मने तुझ्याकडे लागतील असे कर. माझा पुत्र शलमोन याने तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे अंतःकरणपूर्वक पालन करावे, आणि या सर्व गोष्टी कराव्या आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे. तेथे जमलेल्या सर्व लोकांस दावीद म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वरास लोकांनी धन्यवाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले. दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. एक हजार बैल, एक हजार एडके, एक हजार कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलासाठी त्यांनी आणखीही पुष्कळच यज्ञ केले. मग परमेश्वरासमोर सर्व लोकांनी मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. दावीदाचा पुत्र शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राजा म्हणून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकाला अभिषेक केला गेला.
१ इतिहास 29:1-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर सर्व जमलेल्या सभेला दावीद राजा म्हणाला: “माझा पुत्र शलोमोन, ज्याची निवड परमेश्वराने केली आहे, तो अजून तरुण आणि अननुभवी आहे. आणि हे कार्य महान आहे, कारण हे भव्यदिव्य मंदिर मानवाकरिता नव्हे, तर खुद्द याहवेह परमेश्वरासाठी आहे. माझ्या उपलब्धींचा उपयोग करून परमेश्वराच्या मंदिरासाठी जितक्या वस्तू गोळा करता येतील, तितक्या मी केल्या आहेत—सोन्याच्या कामासाठी सोने, चांदीच्या कामासाठी चांदी, कास्याच्या कामासाठी कास्य, लोखंडाच्या कामासाठी लोखंड, लाकडाच्या कामासाठी लाकूड, गोमेद आणि जडावाच्या कामासाठी रंगीबेरंगी पाचूरत्न, उत्तम रत्ने, संगमरवरी पाषाण—मी गोळा केले आहेत. माझा भक्तिभाव माझ्या परमेश्वराच्या मंदिरावर आहे, म्हणून माझ्या व्यक्तिगत खजिन्यातून जो सोने आणि चांदीचा मी संग्रह केला आहे, तो मी परमेश्वराच्या मंदिरासाठी देतो. याव्यतिरिक्त या पवित्र मंदिरासाठी मी दिले आहे: ओफीराचे तीन हजार तालांत सोने आणि मंदिराच्या भिंती मढविण्यासाठी सात हजार तालांत शुद्ध चांदी. सर्व सोने आणि चांदीची कामे कारागिरांकडून करण्यात येतील. आता स्वेच्छेने याहवेहसाठी स्वतःचे पवित्रीकरण करण्यास कोण तयार आहे?” मग कुटुंबप्रमुख, इस्राएल गोत्राचे अधिकारी, हजार सैनिकांचे अधिकारी, आणि शंभर सैनिकांचे अधिकारी, राजाचे शासकीय अधिकारी यांनी स्वेच्छेने दान दिले. परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी त्यांनी पाच हजार तालांत आणि दहा हजार दारिक सोने, दहा हजार तालांत चांदी, अठरा हजार तालांत कास्य आणि एक लाख तालांत लोखंड दिले. ज्यांच्याकडे रत्ने होती ती त्यांनी खजिन्यामध्ये जमा करण्यासाठी याहवेहच्या मंदिरातील खजिनदार गेर्षोनी यहीएलकडे सोपविली. पुढाऱ्यांच्या या स्वेच्छेने दिलेल्या प्रतिसादाने सर्व लोक आनंदित झाले, कारण त्यांनी स्वयंस्फुर्तीने व पूर्ण अंतःकरणाने, आनंदाने याहवेहच्या सेवेला दिले, दावीद राजालाही मोठा आनंद झाला. दावीदाने सर्व सभेदेखत याहवेहची स्तुती केली, तो म्हणाला, “हे याहवेह परमेश्वरा, आमच्या इस्राएलच्या पित्याच्या परमेश्वरा, अनादि ते अनंतकालापर्यंत तुमची स्तुती असो. याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे; गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो, पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे! याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे; तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे. श्रीमंती व सन्मान तुमच्याकडूनच येतात; तुम्ही सर्व गोष्टीचे शासक आहात. सर्वांना मोठेपणा व सामर्थ्य देण्याकरिता केवळ तुमच्याच बाहूत सामर्थ्य आणि अधिकार आहे. आता, हे आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचे उपकार मानतो, आणि तुमच्या वैभवी नावाची स्तुती करतो. “परंतु मी कोण, माझी शक्ती आणि माझे लोक कोण, जे तुम्हाला इतक्या उदारतेने दान देऊ शकतील? आमच्याजवळचे सर्वकाही तुमच्याकडूनच मिळालेले आहे आणि तेच आम्ही तुम्हाला देत आहोत. आम्ही तुमच्या दृष्टीने आमच्या पूर्वजांप्रमाणे परकीय व अगांतुक आहोत. आमचे पृथ्वीवरील दिवस एखाद्या सावलीप्रमाणे आहेत, काही आशा न ठेवता ते नाहीसे होतील. हे आमच्या याहवेह परमेश्वरा, तुमच्या पवित्र नावासाठी, तुमचे मंदिर बांधण्यास जे प्रचंड साहित्य आम्ही गोळा केले आहे, ते सर्व तुमच्याकडून मिळाले आहे, हे सर्वकाही तुमचेच आहे. माझ्या परमेश्वरा, मी जाणतो, तुम्ही हृदयाची परीक्षा घेता आणि खरेपणाने प्रसन्न होता. मी या सर्व वस्तू स्वखुशीने व प्रामाणिक हेतूने दिल्या आहेत. आणि आता हे बघून मला आनंद झाला की तुमच्या लोकांनीही किती आनंदाने स्वखुशीने या देणग्या दिल्या आहेत. हे याहवेह, आमच्या पित्या अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल यांच्या परमेश्वरा, तुमच्या लोकांच्या मनात या इच्छा कायम राखा आणि त्यांचे अंतःकरण तुमच्याशी एकनिष्ठ राहू द्या. माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.” नंतर दावीद सर्व मंडळीला म्हणाला, “तुमच्या याहवेह परमेश्वराची स्तुती करा.” म्हणून त्या सर्वांनी आपल्या पूर्वजांचे याहवेह परमेश्वराची मस्तके लववून, दंडवते घालून, त्यांचा राजा याहवेहची स्तुती केली. दुसर्या दिवशी त्यांनी याहवेहसाठी यज्ञ व होमबली अर्पण केले: एक हजार गोर्हे, एक हजार मेंढे आणि एक हजार कोकरे, सोबत पेयार्पणे, तसेच इस्राएलींच्या वतीने इतर विपुल अर्पणे वाहिली. त्यांनी त्या दिवशी याहवेहसमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलोमोनचा याहवेहसमोर आणि सर्व पुढार्यांसमोर पुन्हा राज्यकर्ता म्हणून राज्याभिषेक केला. आपला याजक म्हणून त्यांनी सादोकाचाही याजक म्हणून अभिषेक केला.
१ इतिहास 29:1-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर दावीद राजाने सर्व मंडळीला म्हटले, “माझा पुत्र शलमोन सुकुमार बालक आहे, ह्यालाच देवाने निवडले आहे आणि काम तर मोठे आहे; कारण हे भवन मानवासाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे. माझ्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदींच्या वस्तूंसाठी चांदी, पितळेच्या वस्तूंसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड व लाकडी वस्तूंसाठी लाकूड, गोमेदमणी, जडवण्यासाठी रत्ने, जडावाच्या कामासाठी रंगारंगांचे नग, हरतर्हेची रत्ने व संगमरवरी पाषाण ह्यांची रेलचेल मी आपले सगळे बळ खर्चून केली आहे. ह्याशिवाय माझे चित्त माझ्या देवाच्या मंदिराकडे लागले आहे म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे त्याशिवाय आणखी माझा स्वतःचा सोन्यारुप्याचा निधी मी देवाच्या मंदिरासाठी देतो. मंदिराच्या भिंती मढवण्यासाठी तीन हजार किक्कार1 ओफीरचे सोने व सात हजार किक्कार शुद्ध रुपे मी देतो; सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदीच्या वस्तूंसाठी चांदी ही कारागिरांकडून बनवायच्या सर्व कामासाठी मी देत आहे. तर परमेश्वरास आज स्वेच्छेने वाहून घेण्यासाठी कोण तयार आहे?” तेव्हा पितृकुळांचे प्रमुख व इस्राएलांच्या वंशांचे सरदार, सहस्रपती, शतपती आणि राजाच्या घरचे कारभारी ह्यांनी स्वेच्छेने देणग्या दिल्या; देवाच्या मंदिराच्या कार्यासाठी पाच हजार किक्कार सोने व दहा हजार दारिक2 सोने, दहा हजार किक्कार चांदी, अठरा हजार किक्कार पितळ, एक लाख किक्कार लोखंड त्यांनी दिले. त्यांच्याजवळ रत्ने होती ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारासाठी देण्यास गेर्षोनी यहीएल ह्याच्या हवाली केली. तेव्हा लोकांना फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खर्या मनाने व स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ ती अर्पण केली होती; दावीद राजालाही मोठा हर्ष झाला. दावीद परमेश्वराचा धन्यवाद करतो दाविदाने सर्व मंडळीदेखत परमेश्वराचा धन्यवाद केला; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, आमचा पिता इस्राएल ह्याच्या देवा, तू सदासर्वकाळ धन्य आहेस. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच; हे परमेश्वरा; राज्यही तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुझ्यापासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करतोस; सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत; लोकांना थोर करणे व सर्वांना सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. आम्हांला ह्या प्रकारे स्वेच्छेने अर्पणे करता यावीत असा मी कोण? व माझे लोक तरी कोण? सर्वकाही तुझ्यापासूनच प्राप्त होते; तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. आम्ही आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यासमोर उपरे व परदेशी आहोत; ह्या भूतलावरील आमचे दिवस छायेप्रमाणे असतात; आमची काही शाश्वती नाही. हे परमेश्वरा, आमच्या देवा, हा जो मोठा निधी आम्ही तुझ्या पवित्र नामाचे मंदिर बांधण्यासाठी जमवला आहे हा तुझ्याच हातून आम्हांला मिळाला आहे; हा सर्व तुझाच आहे. माझ्या देवा, मला ठाऊक आहे की, तुला हृदयाची पारख आहे; सरळता तुला पसंत आहे; मी तर आपल्या सरळ हृदयाने ह्या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पित केल्या आहेत; तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वेच्छेने तुला अर्पणे केली आहेत हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे. हे परमेश्वरा, आमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, तुझ्या प्रजाजनांच्या हृदयाच्या ठायी हे विचार व ह्या कल्पना निरंतर वागतील व त्यांची मने तुझ्याकडे नेहमी लागतील असे कर. माझा पुत्र शलमोन ह्याला असे सात्त्विक मन दे की त्याने तुझ्या आज्ञा, तुझे निर्बंध व तुझे नियम पाळून हे सर्वकाही करावे आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे.” मग दावीद सर्व मंडळीला म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करा.” तेव्हा सर्व मंडळीने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला आणि आपली मस्तके लववून परमेश्वराला व राजाला वंदन केले. दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ केले व होमबली अर्पण केले; त्यांनी एक हजार बैल, एक हजार एडके व एक हजार कोकरे पेयार्पणांसहित अर्पून सर्व इस्राएलासाठी विपुल यज्ञ केले; त्यांनी त्या दिवशी परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलमोन ह्याला दुसर्यांदा राजा नेमून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी त्याला व याजकाच्या कामासाठी सादोकाला अभिषेक केला.