१ इतिहास 18:1-13
१ इतिहास 18:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यानंतर असे झाले की, दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला. त्याने पलिष्ट्यांच्या हातातून गथ आणि त्यांची गावे घेतली. मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दावीदाचे सेवक झाले आणि त्यास कर देऊ लागले. मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दावीदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला. दावीदाने त्याच्याकडून एक हजार रथ, सात हजार सारथी, आणि वीस हजार पायदळ एवढे घेतले. दावीदाने रथाच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या पण त्यातून शंभर रथाचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले. जेव्हा दिमिष्क नगरातील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजर याच्या मदतीला आले, त्यांच्यापैकी बावीस हजार लोकांसही दावीदाने जिवे मारले. नंतर अराममधील दिमिष्कात दावीदाने बस्थान बसविले. अरामी लोक दावीदाचे सेवक होऊन त्यास कर देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जेथे जेथे जात असे तेथे परमेश्वर त्यास जय देत असे. हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि त्या यरूशलेमेला आणल्या. हद्देजराची नगरे टिमथ आणि कून यातून दावीदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरुन नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगाळ व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली. जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली. तेव्हा त्याने हदोराम या आपल्या पुत्राला दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले, कारण दावीद हद्देजराविरुध्द लढला व त्याचा पराभव केला, तोवू आणि हद्देजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने आपल्याबरोबर सोने, रुपे, पितळ याची भांडी आणली. जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रांपासून, अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांच्यापासून घेतले होते, ती भांडीही दावीद राजाने परमेश्वरास समर्पिली. सरुवेचा पुत्र अबीशय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांस मारले. अदोमामध्ये अबीशयने मजबूत बस्थान बसविले आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला.
१ इतिहास 18:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर ताबा घेतला आणि गथ व त्याच्या सभोवतालची गावे पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतली. दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला आणि ते त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची उभारणी करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा हादादेजर याचा हमाथाच्या परिसरात पराभव केला. दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या. जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना ठार केले. नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथेही गेला, तिथे याहवेहने त्याला विजय दिला. हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या. हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ व कून येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. शलोमोनाने हे नंतर वितळविले व मंदिर बांधण्याच्या कामात कास्याची मोठी टाकी, खांब आणि वेदीवरील यज्ञार्पणांसाठी लागणारी उपकरणे बनविण्याच्या उपयोगात आणले. हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे, तेव्हा त्याने आपला पुत्र हादोरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोऊ यांच्यातही युद्ध होते. हदोरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या सर्वप्रकारच्या वस्तू आणल्या. दावीद राजाने या वस्तू, या सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: एदोम आणि मोआब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी. जेरुइयाहचा पुत्र अबीशाईने क्षार खोर्यात एदोमाचे अठरा हजार लोक ठार मारले. त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.
१ इतिहास 18:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यानंतर दाविदाने पलिष्ट्यांना मार देऊन अंकित केले आणि गथ व त्याच्या आसपासची गावे पलिष्ट्यांच्या हातून काढून घेतली. मग त्याने मवाबास मार दिला आणि मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. सोबाचा राजा हदरेजर महानद फराताजवळील आपली सत्ता स्थापित करण्यासाठी जात असता दाविदाने त्याचा मोड केला. दाविदाने त्याच्यापासून एक हजार रथ, सात हजार स्वार व वीस हजार पायदळ हस्तगत केले; रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडल्या, मात्र त्यांतून शंभर रथांचे घोडे राखून ठेवले. दिमिष्क येथील अरामी लोक सोबाचा राजा हदरेजर ह्याला कुमक करण्यासाठी आले तेव्हा दाविदाने त्यांतल्या बावीस हजार लोकांचा संहार केला. मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-तिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई. हजरेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या त्या दाविदाने घेऊन यरुशलेमास आणल्या. हदरेजर ह्याची टिभथ व कून ही नगरे होती तेथून दाविदाने पुष्कळ पितळ आणले; त्यापासूनच पुढे शलमोनाने गंगाळसागर, खांब व पितळी पात्रे केली. दाविदाने हदरेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोवू ह्याच्या कानावर गेले; दाविदाने हदरेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता; म्हणून तोवू राजाने दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यास व त्याचे अभिनंदन करण्यास आपला पुत्र हदोराम ह्याला त्याच्याकडे पाठवले; कारण हदरेजर व तोवू ह्यांच्या लढाया होत असत; हदोरामाने बरोबर हरतर्हेची सोन्यारुप्याची व पितळेची पात्रे आणली. सर्व जिंकलेल्या राष्ट्रांतून आणलेल्या सोन्याचांदीबरोबर हीही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला समर्पण केली. अदोमी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी व अमालेकी ह्या सर्वांपासून ही लूट आणली होती. सरूवेचा पुत्र अबीशय ह्याने क्षार खोर्यात अठरा हजार अदोम्यांना मार दिला. त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली आणि सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्याला यश दिले.