YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 9:16-33

रोमकरांस 9:16-33 MRCV

हे मानवी इच्छेने किंवा प्रयत्नांनी नव्हे, तर परमेश्वराच्या दयेवर अवलंबून आहे. शास्त्रलेख फारोहला सांगते: “मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, माझे सामर्थ्य तुझ्यामध्ये प्रकट व्हावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.” यास्तव ज्यांच्यावर दया करावी असे परमेश्वराला वाटते, त्यांच्यावर ते दया करतात व ज्याला कठोर करावे त्यांना ते कठोर करतात. तुमच्यापैकी काही मला म्हणतील: “परमेश्वर आम्हाला दोष का लावतात? त्यांच्या इच्छेला विरोध कोण करणार?” मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? “घडलेल्या वस्तूने ती घडविणार्‍याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ ” कुंभाराला एकाच मातीच्या गोळयातून एक पात्र विशेष उद्देशासाठी व काही सामान्य वापरासाठी घडविण्याचा अधिकार नाही काय? परंतु आपला क्रोध दाखवावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे परमेश्वराने ठरविले तर, नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांचे फार सहनशीलतेने सहन करतील काय? त्यांनी हे अशासाठी केले की पूर्वीच तयार केलेल्या दयेच्या पात्राला त्यांच्या वैभवाची धनसंपत्ती प्रकट करावी. आम्हाला पण त्यांनी बोलाविले, केवळ यहूदीयातूनच नाही तर गैरयहूदीयातूनही नाही का? होशेयाने म्हटल्याप्रमाणे: “जे माझे लोक नाहीत त्यांना मी ‘माझे लोक’ म्हणेन; आणि जी मला प्रिय नाही तिला मी ‘माझी प्रिया’ असे म्हणेन,” आणि, “ज्या ठिकाणी म्हटले होते, तुम्ही माझे लोक नाहीत, तिथे त्यांना जिवंत परमेश्वराची लेकरे असे म्हणतील.” यशायाह इस्राएलाविषयी उच्च वाणीने म्हणतो: “इस्राएलाची संख्या समुद्राच्या वाळूच्या कणासारखी असली, तरी अवशिष्ट मात्र तारले जातील. कारण प्रभू त्यांचा दंड पृथ्वीवर वेगाने आणि निर्णयात्मक रीतीने अंमलात आणतील,” यशायाहने आधी म्हटल्याप्रमाणे: “सेनाधीश प्रभूने जर आमचे वंशज वाचविले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो आणि गमोरासारखी आमची गत झाली असती.” तर मग आपण काय म्हणावे? गैरयहूदी लोक खर्‍या अर्थाने नीतिमत्वाचा शोध करीत नव्हते, तरी त्यांना विश्वासाद्वारे नीतिमत्व प्राप्त झाले. पण नियमशास्त्राद्वारे नीतिमत्व मिळण्यासाठी प्रयत्न करणारे इस्राएल लोक मात्र ते प्राप्त करू शकले नाहीत. का नाही? कारण विश्वासाने नव्हे तर कर्माने मिळेल म्हणून ते त्याच्यामागे लागले. ते अडखळविणार्‍या धोंड्याला अडखळले. असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक ठेवतो ज्यामुळे ते पडतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”