YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 7:1-9

रोमकरांस 7:1-9 MRCV

बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यांना नियमशास्त्र माहीत आहे, त्यांच्याबरोबर मी बोलतो, एखादी व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राचे प्रभुत्व तिच्यावर राहते हे तुम्हाला समजत नाही काय? उदाहरणार्थ, लग्न झालेली स्त्री तिचा पती जिवंत असेपर्यंत त्याला बांधलेली असते, परंतु जर तिचा पती मरण पावला, तर ती ज्या नियमाद्वारे त्याला बांधलेली असते त्यापासून मुक्त होते. पती जिवंत असताना, तिने दुसर्‍या पुरुषाशी संबंध ठेवले तर तिला व्यभिचारिणी म्हणतात; पण पती मरण पावल्यावर ती त्या नियमापासून मुक्त होते; नंतर तिने दुसर्‍या पुरुषाशी विवाह केला, तर ती व्यभिचारिणी होत नाही. त्याप्रमाणे बंधू व भगिनींनो, तुम्ही सुद्धा ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मृत झाले आहात, म्हणून तुम्ही दुसर्‍याचे, जो मरणातून उठविला गेला त्याचे व्हावे यासाठी की तुम्ही परमेश्वरासाठी फळ द्यावे. आपण पापी स्वभावाच्या नियंत्रणात होतो, व ज्या कृत्यांचे फळ मरण आहे, ती करावयास आपल्या वासना नियमानुसार आपल्यामध्ये कार्य करीत होत्या. परंतु आता ज्याने आपल्याला बांधून ठेवले होते, त्याला आपण मेलेले आहोत, म्हणून नियमशास्त्रातील जुन्या लेखाप्रमाणे नव्हे, तर एका नव्या आत्म्याच्या मार्गाने सेवा करू या. तर मग आपण काय म्हणावे? नियम पापमय आहे का? नक्कीच नाही! नियमाशिवाय पाप काय आहे हे मला समजले नसते. “तू लोभ करू नको,” असे नियमशास्त्र मला म्हणाले नसते, तर लोभ काय आहे हे मला कधीच समजले नसते. परंतु पापाने नियमांचा फायदा घेऊन संधी साधून माझ्यामध्ये सर्वप्रकारचा लोभ उत्पन्न केला; कारण नियमांशिवाय पाप मृत आहे. अशी वेळ होती जेव्हा मी नियमशास्त्राशिवाय जिवंत होतो; परंतु आज्ञा आल्यावर, पाप जीवित झाले आणि मी मरण पावलो.