YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 15:1-16

रोमकरांस 15:1-16 MRCV

आपण जे बळकट आहोत, ते आम्ही अशक्तांना भार वाहण्यास मदत केली पाहिजे, केवळ आपण स्वतःलाच संतुष्ट करू नये. आपण प्रत्येकजण आपल्या शेजार्‍यांचे हित व उन्नती करून त्यांना संतुष्ट करण्याकडे लक्ष देऊ या. कारण ख्रिस्तानेसुद्धा स्वतःला संतुष्ट केले नाही, परंतु असे लिहिले आहे: “तुझा अपमान करणार्‍याने केलेला अपमान माझ्यावर आला आहे.” कारण जे काही पूर्वी लिहिण्यात आले, ते सर्व आपल्याला शिक्षण मिळावे म्हणून लिहिले गेले, यासाठी की धीर धरून शास्त्रलेखापासून मिळणार्‍या प्रोत्साहनाद्वारे आपण आपल्या आशेला दृढ धरून राहवे. धीर व प्रोत्साहन देणारा परमेश्वर तुम्हाला एकमेकांबरोबर एकचित्ताने राहण्यास साहाय्य करो. प्रत्येकाने एकमेकांशी ख्रिस्त येशूंच्या ठायी असलेल्या वृत्तीने व विचाराने वागावे, आणि मग आपल्याला एकमनाने व एकसुराने, परमेश्वराचे म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याचे गौरव करता येईल. ख्रिस्ताने जसा तुमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा परमेश्वराच्या स्तुतीसाठी स्वीकार करा. कारण मी तुम्हाला सांगतो की, ख्रिस्त परमेश्वराचे सत्य प्रस्थापित करण्याकरिता यहूदीयांचे सेवक झाले आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेली अभिवचने पूर्ण करावी, म्हणजे गैरयहूदी लोकांनी परमेश्वराच्या दयेमुळे त्यांचे गौरव करावे. असे लिहिले आहे: “यास्तव गैरयहूदी लोकांमध्ये मी तुमचे स्तवन करेन; व तुमच्या नावाचे गुणगान गाईन.” आणखी असे म्हटले आहे, “अहो, गैरयहूदीयांनो, तुम्हीही त्यांच्या लोकांसह आनंद करा.” आणखी पुन्हा, “सर्व गैरयहूदी लोकांनो प्रभूची स्तुती करा; प्रत्येक राष्ट्र त्यांचे गौरव करो.” आणि यशायाह संदेष्टा म्हणतो, “इशायाचे मूळ उगवेल, व ते राष्ट्रांचा शासक होण्यास उभे राहतील; गैरयहूदीयांच्या आशा त्यांच्यामध्येच आहेत.” तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आशेचे परमेश्वर तुम्हाला सर्व आनंदाने आणि शांतीने भरो, यासाठी की तुमच्यामध्ये असणार्‍या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात विपुल आशेमध्ये तुम्ही वाढत जावे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही स्वतः चांगुलपणाने पूर्ण भरलेले व ज्ञानाने परिपूर्ण आणि एकमेकांना शिकवण्यास पात्र आहात याची मला नक्कीच खात्री आहे. त्यांची तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यावी म्हणून मी काही गोष्टींबद्दल धीटपणे लिहिले आहे, कारण परमेश्वराने मला कृपा दिली आहे की गैरयहूदीयांसाठी मी ख्रिस्त येशूंचा सेवक व्हावे. त्यांनी मला परमेश्वराची शुभवार्ता जाहीर करण्यासाठी याजकपण सोपविले आहे, यासाठी की गैरयहूदीयांना पवित्र आत्म्याने वेगळे केलेले व परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावे.