YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 144:1-15

स्तोत्रसंहिता 144:1-15 MRCV

याहवेहचे, माझ्या आश्रय खडकाचे स्तवन असो, ते माझ्या बाहूंना युद्धाचे व माझ्या बोटांना लढाईचे प्रशिक्षण देतात. तेच माझे प्रेमळ परमेश्वर आणि माझा दुर्ग, सुरक्षितेचा बुरूज आणि माझे मुक्तिदाता आहेत; तेच माझी ढाल, माझे आश्रयस्थान आहेत, ते माझ्या प्रजेला माझ्यासमोर नम्र करतात. हे याहवेह, मानव तो काय की तुम्ही त्याची काळजी घ्यावी, नश्वर मानव तो काय की त्याचा तुम्ही विचार करावा? कारण मानव केवळ श्वासवत आहे; सरणार्‍या सावलीप्रमाणे त्याचे आयुष्य आहे. हे याहवेह, स्वर्ग उघडून खाली या; पर्वतांना स्पर्श करा म्हणजे ते धुमसतील. विजांचे लोळ मोकळे सोडा आणि शत्रूंची दाणादाण उडवून द्या; आपल्या बाणांचा वर्षाव करून त्यांना उधळून टाका. स्वर्गातून आपला हात लांब करून मला मुक्त करा; जलप्रवाहाच्या तडाख्यापासून मला सोडवा, आणि परक्यांच्या सामर्थ्यापासून मला मुक्त करा. त्यांचे मुख असत्य वचनांनी भरलेले असते; त्यांचे उजवे हात कुकर्म करणारे आहेत. हे परमेश्वरा, मी तुमच्यासाठी एक नवे गीत गाईन; दशतंत्री वीणेवर मी तुमच्या स्तवनाचे संगीत बनवेन. राजांना विजय तुमच्यामुळेच प्राप्त होतो, आणि तुमचा सेवक दावीदाला सुरक्षा प्रदान करणारे तुम्हीच आहात. घातकी तलवारीपासून मला सोडवा; ज्यांची मुखे लबाड्यांनी भरलेली आहेत, ज्यांचे उजवे हात फसविणारे आहेत. त्या परक्यांच्या हातून मला सोडवा. मग आमचे पुत्र, तारुण्यात जोपासलेल्या परिपक्व रोपांसारखे होतील; आमच्या कन्या, राजमहालाच्या सजावटीसाठी केलेल्या कोरीव स्तंभासारख्या होतील. आमची अन्नभांडारे सर्वप्रकारच्या वस्तूंनी भरलेली असतील, आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्त्रपट, दशसहस्त्रपट वाढतील. आमची सशक्त गुरे अवजड वाहने वाहतील. आमच्या तटबंदीला भगदाडे पडणार नाहीत, आम्ही पारतंत्र्यात जाणार नाही, आमच्या रस्त्यावर दुःखाच्या आरोळ्या ऐकू येणार नाहीत. ज्या लोकांना असे आशीर्वाद लाभतात ते सुखी होत; ज्या लोकांचा परमेश्वर याहवेह आहे, ते लोक धन्य आहेत.