याहवेहची स्तुती असो! याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे. याहवेहची सर्व गौरवशाली कृत्ये, किंवा त्यांची स्तुती पूर्णपणे कोण जाहीर करेल? जे इतरांशी न्यायाने वागतात, आणि नेहमीच नीतीने आचरण करतात, ते आशीर्वादित असतात. हे याहवेह, जेव्हा तुमच्या प्रजेवर कृपादृष्टी कराल, तेव्हा माझेही स्मरण करा, त्यांचे तारण कराल, तेव्हा मलाही मदत करा. म्हणजे तुम्ही निवडलेल्यांच्या समृद्धीत मलाही वाटा मिळेल, आणि तुमच्या राष्ट्रांच्या सर्व आनंदामध्ये मीही सहभागी होईन, आणि तुमच्या वारसांसह मी देखील तुमचे स्तुतिगान करेन. आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले; आम्ही अपराध केला आणि दुष्टतेने वागलो. जेव्हा ते इजिप्तमध्ये होते, तेव्हा तुम्ही केलेल्या अद्भुत चमत्कारांकडे त्यांनी लक्ष दिले नाही; तुम्ही केलेली अनेक दयाळूपणाची कृत्ये ते विसरले; उलट, तांबड्या समुद्राकाठी त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले. तरीसुद्धा आपल्या नामासाठी, आपले सामर्थ्य प्रगट करण्यासाठी परमेश्वराने त्यांचे तारण केले. तांबड्या समुद्राला दरडावताच तो कोरडा झाला; वाळवंटातून चालत असल्यासारखे त्यांना खोल समुद्रातून चालविले. त्यांना त्यांच्या शत्रूपासून सोडविले; शत्रूंच्या अधिकारातून त्यांची सुटका केली. त्यांच्या शत्रूंना जलसमाधी मिळाली; त्यापैकी एकजणही वाचला नाही. तेव्हा लोकांनी त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवला, व त्यांचे स्तुतिगान केले. परंतु त्यांनी केलेले कार्य ते लवकर विसरले, त्यांनी केलेली योजना पूर्ण होण्याची त्यांनी वाट पाहिली नाही. ओसाड भूमीत त्यांनी आपल्या उत्कट इच्छांना मोकळी वाट करून दिली; वाळवंटात परमेश्वराची परीक्षा पाहिली. परमेश्वराने त्यांच्या मागण्या पुरविल्या, परंतु जीव झुरणीस लावणारा रोगही त्यांच्याकडे पाठविला. तंबूत असताना मोशे आणि याहवेहचा अभिषिक्त अहरोन यांच्या विरुद्धही त्यांचा हेवा वाढला. मग पृथ्वी उघडली आणि तिने दाथानाला गिळून टाकले; अबीराम व त्याच्या समुहाला दफन केले. आणि त्यांच्या अनुयायांवर अग्निपात झाला; दुष्ट माणसांना भस्म करण्यात आले. होरेब येथे त्यांनी एका वासराची मूर्ती घडविली, आणि त्या धातूच्या मूर्तीची आराधना केली. परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल गवत खाणार्या बैलाच्या प्रतिमेशी केली. त्या परमेश्वराला ते विसरले, ज्यांनी त्यांना सोडविले, इजिप्त देशात महान चमत्कार केले, हामच्या भूमीत आश्चर्यकर्म केले, आणि तांबड्या समुद्राकाठी चमत्कार केले. मग ते म्हणाले की ते त्यांचा नाश करतील— जर खुद्द त्यांनी निवडलेला पुरुष मोशे, मध्ये उभा राहिला नसता तर, त्यांनी आपला क्रोध न आवरता त्या लोकांचा नाश केला असता.
स्तोत्रसंहिता 106 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 106:1-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ