YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 26:17-28

नीतिसूत्रे 26:17-28 MRCV

आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे एखाद्या भटक्या कुत्र्याचे कान ओढणार्‍यासारखे असतात. जसा एखादा माथेफिरू मृत्यूचे जळते बाण फेकतो, तो अशा मनुष्यासारखा आहे, जो त्याच्या शेजार्‍यांना फसवितो आणि म्हणतो, “मी तर गंमत करीत होतो!” लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते. जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते, तशाच प्रकारे भांडखोर मनुष्य कलह उत्पन्न करतो. अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात. गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण चांदीचा मुलामा दिलेल्या मातीच्या पात्रासारखे आहे. शत्रू त्यांच्या वाणीद्वारे स्वतःला लपवितात, परंतु कपटाला ते त्यांच्या मनात थारा देतात. जरी त्यांचे भाषण प्रसन्न करणारे आहे, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण सात प्रकारच्या वाईट गोष्टींनी त्यांचे अंतःकरण भरलेले असते. त्यांचा द्वेषभाव लबाडीद्वारे लपविलेला असला तरी, त्यांचा दुष्टपणा सभेमध्ये उघड केला जाईल. जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल. लबाड बोलणारी जीभ ज्याचा द्वेष करते त्याला दुखविते, आणि खुशामत करणारी जीभ नाशास कारणीभूत होते.

नीतिसूत्रे 26 वाचा