YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस 1:12-20

फिलिप्पैकरांस 1:12-20 MRCV

आता प्रिय बंधू भगिनींनो, जे माझ्याबाबतीत घडले त्यामुळे प्रत्यक्ष शुभवार्तेच्या कार्यात वाढ झाली आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. याचा परिणाम असा झाला की, राजवाड्यामध्ये असलेले पहारेकरी आणि प्रत्येकास हे स्पष्टपणे माहीत झाले आहे की मी ख्रिस्तासाठी बंधनात आहे. आणि माझ्या या बंधनामुळे, येथील बहुतेक बंधू व भगिनींना प्रभुमध्ये धैर्य प्राप्त झाले आहे आणि ते पहिल्यापेक्षा धैर्याने शुभवार्ता अधिक निर्भयपणे जाहीर करत आहेत. हे सत्य आहे की, काहीजण हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, परंतु अन्य काही चांगल्या उद्देशाने करतात. दुसरे जे आहेत ते प्रीतिमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे. पण पूर्वीचे जे आहेत ते काहीजण ख्रिस्ताचा प्रचार स्वार्थी महत्वाकांक्षेने व अप्रामाणिकपणे करतात, यामुळे येथे मी बंधनात असताना ते माझ्या दुःखात भर घालतात. परंतु यापासून काय होते? त्यांचे हेतू खरे असो किंवा खोटे असो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रकारे ख्रिस्ताचा प्रचार होत आहे आणि त्यातच मी आनंद करणार. होय, त्यातच मी आनंद करीत राहीन. कारण जे काही मला झाले त्यातून, तुमच्या प्रार्थनेद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या पुरवठ्याने माझी सुटका होईल हे मला माहीत आहे. याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा.