YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 6:1-12

गणना 6:1-12 MRCV

मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: एखादा पुरुष किंवा स्त्री याहवेहला समर्पित नाजीर होण्याचा एक विशेष नवस करू इच्छितात, तर त्या नाजीरांनी द्राक्षारस व इतर आंबलेले पेय वर्ज्य करावे आणि त्यांनी द्राक्षारसाचा शिरका किंवा इतर आंबलेले पेय पिऊ नये. त्यांनी द्राक्षाचा रस पिऊ नये किंवा द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत. जोपर्यंत ते नाजीराच्या नवसाखाली असतील, तोपर्यंत त्यांनी द्राक्षवेलीचा कोणताही उपज, साल व बीज सुद्धा खाऊ नये. “ ‘नाजीरपणाच्या संपूर्ण काळात त्यांच्या डोक्यावर वस्तरा फिरवू नये. त्यांनी याहवेहला समर्पित केलेला नवसाच्या काळ संपेपर्यंत त्यांनी पवित्र असावे; त्यांनी आपले केस लांब वाढू द्यावेत. “ ‘याहवेहला समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत, नाजीराने मृतदेहाजवळ जाऊ नये. त्यांचे स्वतःचे वडील किंवा आई किंवा भाऊ किंवा बहीण जरी मरण पावले, तरीही त्यांच्यामुळे त्यांनी स्वतःला विधिपूर्वक अशुद्ध करू नये, कारण परमेश्वराला समर्पित केल्याचे प्रतीक त्यांच्या डोक्यावर आहे. समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत ते याहवेहसाठी पवित्र आहेत. “ ‘जर नाजीराच्या समक्षतेत कोणी अचानक मरण पावला, तर त्यांच्या डोक्यावरील केस, समर्पणाचे प्रतीक विटाळले जाते, त्यावेळी सातव्या दिवशी; शुद्धीकरणाच्या दिवशी त्यांनी आपले मुंडण करावे. मग आठव्या दिवशी त्यांनी दोन कबुतरे किंवा पारव्यांची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी. मग नाजीरासाठी याजकाने त्यापैकी एक पापार्पण व दुसरा होमार्पणाचे प्रायश्चित म्हणून अर्पण करावा, कारण मृतदेहाच्या समक्षतेत राहून त्यांनी पाप केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा आपले डोके पवित्र करावे. आणि त्यांनी आपला नाजीरपणाचा काळ याहवेहसाठी पुनर्समर्पित करावा आणि दोषार्पण म्हणून एक वर्षाचा कोकरा आणावा. आधीचे दिवस मोजले जाणार नाही, कारण त्यांच्या समर्पित असलेल्या काळात ते विटाळले गेले.

गणना 6 वाचा