YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 5:1-13

नहेम्या 5:1-13 MRCV

काही काळानंतर स्त्रीपुरुषांनी आपल्या यहूदी बांधवांविरूद्ध तक्रार करण्यास सुरुवात केली. काहीजण म्हणाले, “आम्ही व आमचे पुत्र व कन्या असे बरेच लोक आहोत आणि जिवंत राहण्यासाठी आम्हाला धान्याची गरज आहे.” दुसरे म्हणाले, “दुष्काळापासून जीव वाचवावा म्हणून धान्य मिळविण्यासाठी आम्हाला आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागली आहेत.” आणखी दुसरे काही म्हणाले, “आमची शेते आणि द्राक्षमळे यावरील राजाचा कर भरता यावा म्हणून आम्हाला कर्जाऊ पैसे काढावे लागले आहेत. आम्ही त्यांचेच बांधव आहोत आणि आमची मुले त्यांच्या मुलांबाळांसारखीच आहेत, तरीसुद्धा जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळावेत म्हणून आम्हाला आमची मुले व मुली गुलाम म्हणून कामाला लावावी लागतात. आमच्या काही कन्या आम्ही आधीच गुलाम म्हणून विकलेल्या आहेत, पण आम्ही असमर्थ आहोत, कारण आमची शेते व द्राक्षमळेसुद्धा इतरांचे झाले आहेत.” जेव्हा मी त्यांचा हा आक्रोश व या तक्रारी ऐकल्या, तेव्हा मी अतिशय संतापलो. या परिस्थितीवर विचार केल्यानंतर मी या प्रतिष्ठितांना व अधिकार्‍यांना म्हणालो, “तुम्ही स्वतःच्याच देशबांधवांकडून व्याज गोळा करीत आहात!” मग त्यांचा समाचार घेण्यासाठी मी एक मोठी सभा बोलाविली. या सभेत मी त्यांना म्हणालो, “आम्ही गैरयहूद्यांना गुलामगिरीत विकलेल्या आपल्या यहूदी बांधवांना शक्य होईल तितक्यांना परत आणले आहे. आता तुम्ही मात्र तुमच्याच लोकांना विकून, त्यांना पुन्हा आम्हाला विकत आहात! त्यांची सुटका आम्ही किती वेळा करावी?” हे ऐकून ते स्तब्ध राहिले कारण त्यांना त्यावर उत्तरच सापडले नाही. मग मी पुढे म्हणालो, “तुम्ही जे करीत आहात, ते अयोग्य आहे. आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये आपली निंदा होऊ नये म्हणून तुम्ही परमेश्वराचे भय बाळगू नये काय? मी व माझे बंधू, आणि माझे लोक कोणतेही व्याज न घेता पैसे आणि धान्य उसने देत आहोत. आपण हे व्याज घेणे बंद केले पाहिजे! त्यांची शेते, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे त्यांना लगेच परत करा व पैसे, धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यावरील एक टक्का जे व्याज म्हणून तुम्ही त्यांच्याकडून घेता ते सोडून द्या.” त्यांनी म्हटले, “आम्ही त्यांना सर्वकाही परत देऊ. आणि त्यांच्याकडून काहीही मागणी करणार नाही. तुम्ही म्हणता तसेच आम्ही करू.” मग मी याजकांना बोलाविणे पाठविले, प्रतिष्ठित व इतर अधिकाऱ्यांकडून त्यांनी जे वचन दिले होते, त्या शपथा घेण्यास लावल्या. व माझ्या अंगरख्याची दुमड धरून तो झटकून म्हटले, “जो कोणी या शपथेचे पालन करणार नाही, परमेश्वर त्याची घरे व त्याची संपत्ती असेच झटकून टाकेल. तर असा मनुष्य असाच झटकला जाऊन पूर्णपणे रिकामा होवो!” यावर सभेतील सर्व लोक म्हणाले, “आमेन” आणि त्यांनी याहवेहची स्तुती केली. सर्व लोकांनी आपल्या वचनाप्रमाणे केले.

नहेम्या 5 वाचा