येशूंनी सरोवराच्या किनार्यावर शिकविण्यास सुरुवात केली. पुन्हा एकदा त्यांच्याभोवती जमा झालेला समुदाय इतका मोठा होता की, ते एका होडीत बसून किनार्यावरील लोकांना शिकवू लागले. त्यांनी अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकविल्या, त्यांच्या शिक्षणात त्यांनी सांगितले: “ऐका! एक शेतकरी बी पेरण्याकरीता निघाला. तो बी पेरीत असताना, काही बी पाऊल वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तेथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. काही बी काटेरी झुडूपांमध्ये पडले, ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटवली व त्याला पीक आले नाही. पण काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले, त्याची वाढ झाली आणि त्या काही ठिकाणी तीसपट, साठपट किंवा शंभरपट पीक आले.”
मग येशू म्हणाले, “ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.”
मग ते एकटे असताना, बारा जणांनी आणि इतरांनी त्यांना दाखल्याबद्दल विचारले. ते म्हणाले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिलेले असले परंतु बाहेरच्यांना सर्वगोष्टी दाखल्याद्वारेच सांगण्यात येतील. यासाठी की,
“ते पाहत असले तरी त्यांना दिसू नये,
कानांनी ऐकत असले, परंतु समजू नये.
नाही तर ते वळतील आणि त्यांची क्षमा होईल!”
नंतर येशू त्यांना म्हणाले, “तुम्हाला हा दाखला समजत नाही का? तर इतर दाखले तुम्हाला कसे समजतील? शेतकरी वचनाची पेरणी करतो. काही लोक त्या वाटेवर पडलेल्या बी प्रमाणे आहेत, जेथे वचन पेरले जाते. ते वचन लागलेच ऐकतात, पण सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो. काहीजण, खडकाळ जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात. कारण वचनामुळे संकटे आली किंवा त्यांचा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. पण त्यांना मूळ नसल्यामुळे, थोडा काळ टिकतात. काही असे आहेत, की ते काटेरी झाडांमध्ये पेरणी केलेल्या बियांप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात; परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा व इतर गोष्टींची हाव याची त्यांना भुरळ पडते आणि त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ येत नाही. याउलट काहीजण, उत्तम जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात, स्वीकार करतात, पीक देतात—जे पेरले होते त्यापेक्षा तीसपट, साठपट आणि शंभरपट पीक देतात.”