YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 16:1-20

मार्क 16:1-20 MRCV

शब्बाथ संपल्यानंतर मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी जाऊन येशूंच्या शरीराला अभिषेक करावा म्हणून सुगंधी मसाले विकत आणले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस, सूर्योदय झाल्यावर त्या कबरेकडे जाण्यास निघाल्या. “आपल्यासाठी कबरेच्या द्वाराशी असलेली धोंड कोण बाजूला करेल?” याविषयी त्या आपसात चर्चा करीत होत्या. त्यांनी वर पाहिले तेव्हा जी धोंड अतिशय मोठी होती, ती प्रवेशद्वारातून बाजूला लोटलेली आहे असे त्यांना दिसले. त्यांनी कबरेच्या आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूला चमकदार पांढरी वस्त्रे परिधान केलेला एक तरुण तिथे बसला होता हे पाहून त्या भयभीत झाल्या. “भिऊ नका,” तो म्हणाला, “क्रूसावर खिळलेल्या ज्या नासरेथकर येशूंना तुम्ही शोधीत आहात. ते येथे नाहीत, ते पुन्हा उठले आहेत. त्यांना ठेवले होते ती जागा पाहा! पण जा, ही बातमी त्यांच्या शिष्यांना आणि पेत्रालाही सांगा, ‘ते तुमच्यापुढे गालीलात जात आहेत. जसे त्यांनी तुम्हाला सांगितले होते तसे ते तिथे तुम्हाला भेटतील.’ ” भयभीत होऊन व थरथर कापत त्या स्त्रिया कबरेपासून पळाल्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या घाबरल्या होत्या. येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे पुनरुत्थित झाले. ते सर्वप्रथम ज्या स्त्रीमधून त्यांनी सात भुते काढली होती त्या मग्दालिया मरीयेला प्रकट झाले. जे लोक येशूंबरोबर होते आणि जे शोक व विलाप करीत होते, त्यांच्याकडे जाऊन तिने हे वर्तमान त्यांना सांगितले. येशू जिवंत आहे आणि तिने त्यांना प्रत्यक्ष बघितले होते, हे जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. नंतर त्याच दिवशी शहरातून चाललेल्या दोघांना येशूंनी वेगळ्या रूपात दर्शन दिले. ते परत आले व इतरांना अहवाल दिला, परंतु त्यांच्यावरही त्यांनी विश्वास ठेवला नाही. नंतर अकरा शिष्य भोजन करण्यास बसले असताना, येशू त्यांना प्रकट झाले. ज्यांनी त्यांना मरणातून उठलेले पाहिले होते, त्यांच्या वार्तेवर त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांनी अविश्वास व हृदयाच्या कठीणपणा बद्दल त्यांचा निषेध केला. ते त्यांना म्हणाले, “सर्व सृष्टीमध्ये जाऊन प्रत्येकाला शुभवार्तेचा प्रचार करा. जे विश्वास ठेवतील आणि बाप्तिस्मा घेतील, त्यांचे तारण होईल. पण जे विश्वास ठेवण्यास नकार देतील, ते दंडास पात्र ठरतील. आणि विश्वास ठेवणार्‍याबरोबर ही चिन्हे असतील: माझ्या नावाने ते भुते काढतील आणि नव्या भाषा बोलतील. ते सापांना आपल्या हातांनी उचलून धरतील; ते कुठलेही प्राणघातक विष प्याले तरी त्यांच्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही; ते आजार्‍यांवर हात ठेवतील व ते बरे होतील.” प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर, ते स्वर्गात वर घेतले गेले आणि परमेश्वराच्या उजवीकडे बसले. मग शिष्य सर्वत्र संदेश सांगत फिरले, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होते आणि जी चिन्हे झाली त्यावरून त्यांचे वचन सत्य असल्याची खात्री होत होती.

संबंधित व्हिडिओ