त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. अशा रीतीने, “अपराधी लोकांत त्याची गणना झाली,” हा शास्त्रलेख पूर्ण झाला. जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, डोकी हालवीत म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना, तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव!” त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षकांनीही त्यांची थट्टा केली. ते म्हणाले, “त्याने दुसर्यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो इस्राएलाचा राजा व ख्रिस्त आहे, त्याला आता क्रूसावरून खाली उतरून येऊ दे, म्हणजे आम्ही पाहू आणि विश्वास ठेवू.” त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्यांनीही त्यांच्यावर अपमानाची रास केली.
संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. आणि दुपारी तीन वाजता, येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एलोई, एलोई, लमा सबकतनी,” म्हणजे “माझ्या परमेश्वरा माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”
तिथे जवळ उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले, “पाहा, तो एलीयाहला बोलावित आहे.”
कोणी एक धावला, शिरक्यात भिजविलेला, एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला व तो म्हणाला, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरविण्यास येतो की काय, हे आपण पाहू!”
मग येशूंनी मोठी आरोळी मारून, शेवटचा श्वास घेतला.
तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला. जेव्हा येशूंच्या समोर उभे असलेल्या शताधिपतीने ते कसे मरण पावले हे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “खरोखरच हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता!”
अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब व योसेफ यांची आई मरीया, सलोमी होत्या. गालीलामध्ये असताना या स्त्रिया येशूंना अनुसरून त्यांची सेवा करीत असत. यरुशलेममधून त्यांच्याबरोबर आलेल्या इतर अनेक स्त्रियाही तिथे होत्या.
हा तयारी करण्याचा दिवस होता (शब्बाथाच्या आधीचा दिवस). संध्याकाळ झाली असताना, सभेचा एक सन्मान्य सभासद अरिमथियाकर योसेफ, स्वतः जो परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता, तो धैर्य करून पिलाताकडे गेला आणि त्याने येशूंचे शरीर मागितले. येशू इतक्या लवकर मरण पावले हे ऐकून पिलाताला नवल वाटले. त्याने शताधिपतीला बोलाविले आणि विचारले, येशूंचा मृत्यू आधी झाला आहे की काय? ते खरे असल्याचे शताधिपतीकडून समजल्यावर, त्याने येशूंचे शरीर योसेफाच्या ताब्यात दिले. योसेफाने एक तागाचे कापड विकत आणले, येशूंचे शरीर खाली काढले, तागाच्या वस्त्राने गुंडाळले आणि खडकात खोदलेल्या एका कबरेत ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने शिळा लोटून ठेवली. त्यांना कबरेत कुठे ठेवले हे, मरीया मग्दालिया आणि योसेफाची आई मरीया यांनी पाहिले.