संध्याकाळ झाली, तेव्हा येशू व त्यांचे शिष्य शहराच्या बाहेर गेले.
सकाळी जात असताना अंजिराचे झाड मुळापासून सुकून गेले आहे असे त्यांना दिसले! पेत्राला आठवण आली आणि त्यांनी येशूंना म्हटले, “गुरुजी, पाहा! ज्याला आपण शाप दिला ते अंजिराचे झाड वाळून गेले आहे!”
येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वरावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या डोंगराला, ‘ऊठ आणि समुद्रात जाऊन पड,’ असे म्हणेल आणि अंतःकरणात संशय न धरता आपण म्हटले तसे होईल असा विश्वास धरला, तर ती गोष्ट त्यांच्यासाठी केली जाईल. यास्तव मी तुम्हाला सांगतो की, प्रार्थना करून जे काही मागाल, ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्याची क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला तुमच्या पातकांची क्षमा करतील. पण तुम्ही क्षमा करणार नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.”
ते परत यरुशलेमला आले, तेव्हा येशू मंदिराच्या आवारात चालत असता, मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले. “कोणत्या अधिकाराने या गोष्टी तुम्ही करत आहात? व तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” असे त्यांना विचारू लागले.
येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर द्या आणि मी हे कोणत्या अधिकाराने करीत आहे, हे मी तुम्हाला सांगेन. मला सांगा, योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून होता?”
या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा ‘स्वर्गापासून होता’ असे जर आपण म्हणालो तर ते विचारतील ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’ पण जर आपण म्हणालो, ‘मनुष्यांपासून होता,’ ” त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण योहान संदेष्टा होता असे प्रत्येकजण मानत होता.
शेवटी त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला माहीत नाही.”
यावर येशू त्यांना म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो, हे तुम्हाला सांगणार नाही.”