YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 4:1-12

मत्तय 4:1-12 MRCV

मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात नेले. चाळीस दिवस व चाळीस रात्र त्यांनी उपवास केला, तेव्हा त्यांना भूक लागली. मग परीक्षक येशूंकडे आला व म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना भाकरीत रूपांतर होण्यास सांग.” तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “ ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक वचनाने जगेल’ असे लिहिले आहे.” मग सैतानाने पवित्र नगरीतील मंदिराच्या सर्वात उंच टोकावर त्यांना उभे केले. तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे: “तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल, आणि तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.” तेव्हा येशूंनी प्रत्युत्तर दिले, “असेही लिहिले आहे: ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ” मग सैतानाने येशूंना एका उंच पर्वतावर नेले. तिथून त्याने त्यांना जगातील सर्व राज्ये व त्याचे गौरव दाखविले. “जर तू पाया पडून माझी उपासना करशील,” तो म्हणाला, “तर हे सर्व मी तुला देईन.” येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर जा! असे लिहिले आहे: ‘केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’” मग सैतान त्यांना सोडून निघून गेला आणि देवदूतांनी येऊन त्यांची सेवा केली. योहानाला बंदिवासात टाकले आहे हे ऐकताच, येशू गालील प्रांतात निघून गेले.